गडचिरोली पोलीस दल व बीओआय-आरसेटी यांच्या पुढाकाराने 35 बेरोजगार युवक-युवतींना फास्ट फूडचे प्रशिक्षण

68

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गडचिरोली पोलीस दल व बीओआय-आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवक-युवतींना फास्ट फुड प्रशिक्षण देवून त्यांना रोजगारासाठी आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे संकल्पनेतुन व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली फास्ट फुड प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण 10/12/2021 रोजी पुर्ण झाल्याने प्रशिक्षणाचा समारोपिय कार्यक्रम नुकताच पार पाडण्यात आला.
सदर फास्ट फुड प्रशिक्षण 01/12/2021 ते 10/12/2021 पर्यंत एकुण 10 दिवसांचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा, धानोरा, जिमलगट्टा, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा या उपविभागातील अतिदुर्गम असलेल्या भागातील रहीवासी असलेल्या एकुण 35 युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलामार्फत फास्ट फुडचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सर्व उमेदवारांना चायनिज पदार्थ बनविण्याबाबत माहिती देण्यात आली. अशी आज रोजी फास्ट फुडचे प्रशिक्षण पुर्ण झाल्याने समारोपिय कार्यक्रमास प्रशिक्षण घेतलेले 35 उमेदवार हजर होते. या दरम्यान उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आम्ही आपल्या परिसरामध्ये फास्ट फुड व्यवसाय उभारून आपले जिवनमान उंचावण्यासाठी आत्मनिर्भर झाले आहोत. असे सांगितले तसेच उमेदवारांनी सदरचे प्रशिक्षणाची संधी गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख उपस्थित होते. तसेच बीओआय-आरसेटीचे संचालक चेतन वैद्य, कार्यक्रम समन्वयक काटकर व हेमंत मेश्राम यांचीउपस्थिती लाभली.
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन आतापर्यंत बीओआय आरसेटी व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली यांचे सहकार्याने ब्युटी पॉर्लर-70, मत्स्यपालन- 60, कुक्कुटपालन-293, शेळीपालन -67, लेडीज टेलर- 35, फोटोग्रॉफी- 35, मधुमक्षिका पालन-32, भाजीपाला लागवड-190 तसेच टु व्हिलर व फोर व्हीलर ड्रायव्हिंग प्रशिक्षण- 100, पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण- 500 अशा एकुण 1382 युवक-युवतींना स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. फास्ट फुड प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.