प्रा. शेषराव येलेकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

1224

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व विकास समिती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित पर्यावरण संमेलन 2022 या कार्यक्रमात प्रा. शेषराव येलेकर यांना पर्यावरण क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल व ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांंसाठी अविरत लढ्याबद्दल, कार्यक्रमाचे उद्घाटक अर्जुनी/ मोरगाव मतदार क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित मित्र आदिवासी सेवक व पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष डि. के. आरीकर तसेच प्रमुख वक्ते, प्रसिद्ध कवी, साहित्यिक प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. शेषराव येलेकर हे गेल्या 20 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर 7 जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेल्या आरक्षण पूर्ववत करण्यासाठी लढा देत होते. त्याचबरोबर ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण , ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व वस्तीगृह इत्यादीसह ओबीसींच्या विविध प्रश्नासाठी त्यांचा लढा सुरू होता. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन व प्रदूषण विषयक जनजागृती इत्यादी कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.