मत्स्य व पशुपालनाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार : ना. पुरुषोत्तम रूपाला

82

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आकांक्षित जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. प्राकृतिक क्षेत्राच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न सरकारकडून सर्वतोपरीने होत आहे. जिल्ह्यातील उपलब्ध साधन, सामुग्रीच्या आधारावर मत्स्य व पशुपालनाला तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यवसाय वृद्धिंगत केल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंंत्री ना. पुरुषोत्तम रूपाला यांनी केले.
गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी ना. रूपाला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतला. तसेच नागरिक, उद्योजक आणि व्यावसायिकांची मत जाणून घेतली.

ना. रूपाला पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, दूरसंचार सेवा आणि इंटरनेटचे जाळे पसरविण्यावर भर दिला जात आहे. गडचिरोलीत बारमाही वाहणाऱ्या नद्या, सुपीक जमीन, प्रचंड जंगल आणि मेहनत करणारे लोकही आहेत. या सगळ्यांना आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मौल्यवान उत्पादन देणाऱ्या नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात नैसर्गिक शेती, मत्स्य व्यवसाय, कुक्कूट पालन, बकरी पालन आणि दुग्ध व्यवसाय या कृषीपूरक व्यवसायामधून परिवर्तन आणले जाऊ शकते, असा विश्वासही ना. रूपाला यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

नक्षल समस्येवर बोलताना ते म्हणाले की, गडचिरोलीतील नक्षली हिंसाचार कमी झाला असून या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला एक विचाराने काम करावे लागेल, असेही ना. पुरुषोत्तम रूपाला म्हणाले.

या पत्रकार परिषदेला भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते, आमदार डाॅ. देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजभे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिताताई भांडेकर, माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, रेखाताई डोळस, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, चांगदेव फाये यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.