केंद्रीय मंत्री ना. पुरूषोत्तम रूपाला यांच्या हस्ते आयुष्यमान भारतमधून दिव्यांग साहित्याचे वाटप

79

– ना. पुरूषोत्तम रूपाला यांनी घेतला जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र अर्थसहाय्यित विविध योजनांचा आढावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवांतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेंतर्गत विविध पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच आयुष्यमान भारत कार्डचे वितरणही करण्यात आले.

यावेळी ते म्हणाले, जिल्हयात प्रधानमंत्री केअर फंडामधून पीएसए ऑक्सिजन प्लांटची उभारणी झाली आहे. कोरोना काळात ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होता ही आनंदाची बाब आहे. देशात आयुष्यमान भारत ही योजना यशस्वीपणे सुरू आहे. जिल्हयातील सर्व गरजुंना आयुष्यमान कार्ड मिळेल यासाठी नियोजन करावे. देश आरोग्य क्षेत्रात प्रगती करीत असून नुकतेच जगातील पहिल्या आयुर्वेद संस्थेला मंजुरी जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळाली आहे. ती संस्था भारतातीलच एक आहे. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी संजय मीणा, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल रूडे उपस्थित होते.

यावेळी ना. रूपाला यांनी आपल्या भाषणादरम्यान सर्व उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना समोर बोलाविले व उपस्थित इतरांना उभे राहून कोविडमध्ये केलेल्या कार्याबद्दल टाळयांच्या गजरात त्यांचा गौरव करण्याचे आवाहन केले. यावेळी मंत्री म्हणाले, कोविड काळात एक अशी वेळ होती की कोविड बाधिताच्या घरच्यांनी सुद्धा त्यांना भेटणे टाळले, दुर्दैवी मृत पावलेल्या रूग्णांच्या काही नातेवाईकांनी मृतास पाहणेही नाकारले. परंतू या आरोग्य योद्ध्यांनी सर्व आवश्यक मदत रूग्णांना दिली. त्यांचे कार्य न मोजता येणारे आहे. यासाठी त्यांचा सन्मान यथायोग्य आहे.

आरोग्य मेळाव्याच्या शेवटी आयुष्यमान भारत योजनेंतर्गत विविध पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच आयुष्यमान भारतच्या कार्डचे वितरणही करण्यात आले. तत्पुर्वी जिल्हा सामान्य रूग्णालयात पीएम केअर फंडातून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला.

केंद्र अर्थसहाय्यीत विविध योजनांचा घेतला आढावा
केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. पुरूषोत्तम रूपाला यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात केंद्र अर्थसहाय्यीत विविध योजनांचा आढावा घेतला. यामध्ये स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, रोजगार हमी योजना, मुद्रा लोन, स्डॅण्डअप इंडिया, उडान, प्रधानमंत्री सडक योजना यांचा समावेश होता. या बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी विविध योजनांबद्दल सादरीकरण केले. तसेच जिल्हयातील नाविण्यपूर्ण योजनांची माहिती दिली.
या बैठकीत केंद्रीय मंत्री महोदयांनी उपस्थितांचे विविध योजनांमधील केलेल्या कार्याबद्दल आभार मानले. जिल्हयात रिक्त जागांची संख्या जास्त असतानाही केलेले कार्य समाधानकारक असल्याचे ते म्हणाले. रिक्त जागांबाबत आवश्यक त्या स्तरावर चर्चा करणार असल्याचेही ते बोलले. कारण आकांक्षित जिल्हयात कोणत्याही पदावर जागा रिक्त नसणे गरजेचे असून विकास कामांसाठी जागा भरलेल्या प्रशासकीय कामांसाठी गरजेचे असते. जिल्हयात मत्स्य शेतीला चालना द्या, अगदी कमी खर्चात आता मत्स्य शेती करता येते. फक्त शेतात तळे खोदा, चांगले बीज टाका त्यातून निश्चित फायदा होईल असा सल्ला जिल्हयातील युवा शेतकऱ्यांना बैठकीवेळी दिला. केंद्र व राज्याच्या मत्स्य शेतीच्या योजनांचा फायदाही घेण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.

पशुधन सांभाळताना आपली गाय ३ ते ४ लिटर दूध देते. यातून शेतकरी कसा वर येईल. आपल्याला योग्य जनावरांची निवड करावी लागेल. चांगली जनावरे शेतकऱ्यांना अर्थिक अडचणीतून निश्चित बाहेर काढतील असे ते मार्गदर्शनपर भाषणात बोलले. या बैठकीला खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी संजय मीणा, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, अति. जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.