५ टक्के आरक्षण देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार

29

– ढिवर, भोई, केवट, कहार व तत्सम भटक्या जमाती समाजाचा निर्णय

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या ढिवर, भोई, केवट, कहार व तत्सम भटक्या जमातीच्या ब प्रवर्गाला केवळ २.५ टक्के इतके कमी आरक्षण आहे. हे आरक्षण ५ टक्के करण्याची हमी देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी ढिवर, भोई, केवट, कहार व तत्सम संपूर्ण समाजाचा पाठिंबा देण्यात येणार असल्याची भूमिका घेण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्हा ढिवर, भोई, केवट, कहार व तत्सम भटक्या जमाती संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात मोठ्या संख्येने आमचा समाज असूनही पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला. आरक्षणाची टक्केवारी कमी असल्याने शिक्षण आणि नोकरीत कोणतेही स्थान राहिले नाही. निवास आणि उपजिविकेची मोठी वानवा आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही गरीबी व बकालीचे जीवन जगणाऱ्या आमच्या समाजाचा वापर केवळ मतांसाठी केला गेला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत जो पक्ष आणि उमेदवार ढिवर, भोई, केवट, कहार व तत्सम भटक्या जमातीच्या ब प्रवर्गाला ५ टक्के आरक्षण मिळवून देण्याची हमी देईल त्या पक्ष आणि उमेदवारालाच समाजाचा भक्कम पाठिंबा देण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा ढिवर, भोई, केवट कहार व तत्सम भटक्या जमाती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. भाग्यवान मेश्राम, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील बावणे, जिल्हा सचिव किशोर बावणे, जिल्हा संयोजक क्रृष्णाजी मंचर्लावार, सल्लागार भाई रामदास जराते, उकंडराव राऊत, मोहन मदने, विजय घुग्गुसकर, गजानन डोंगरे, परशुरामजी सातार, नारायण मेश्राम, सुधाकर बावणे, बालाजी सोपनकर, दिवाकर भोयर, सिताराम गेडाम, बाबुराव शेंडे, किशोर गेडाम, महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षी गेडाम, पंकज राऊत, दुधराम सहारे, विनोद मेश्राम, प्रकाश मारभते, फुलचंद वाघाडे यांनी दिली आहे.