गोविंदगाव येथे सहाव्या शिक्षण परिषदेचे आयोजन

144

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली / १ डिसेंबर २०२२ : दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी उमानूर केंद्रातर्गत गोविंदगाव येथे सहाव्या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष सरपंचा शंकरीबाई पोरतेट या होत्या तर उद्घाटक म्हणून अहेरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर. एस. मुंगमुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून तिरुपती अल्लूरी उपसरपंच गोविंदगाव, गंगाराम कोठारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री. दामोधर बामनवाडे केंद्र प्रमुख उमानूर, श्री. टी. सी. भुुरसे गट समन्वयक अहेरी, श्री. राज वळवी कैवल्य फाऊंडेशन (kaivalya foundation) , श्री. निलेश कोडापे फुलोरा (fulora) सुलभक हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली. तदनंतर या शिक्षण परिषदेला उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक अहेरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. आर. एस. मुंगमुळे यांचे शाल व श्रीफळ देऊन केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री. के. एन. बावणे यांचा सत्कार गटशिक्षणाधिकारी मुंगमुळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बामनवाडे केंद्र प्रमुख यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी शाळा स्तरावर विविध नाविण्य पूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्नरत रहावे. तसेच फुलोरा उपक्रमातील प्रत्येक कृती प्रत्यक्ष विद्यार्थीस्तर निहाय राबवून शाळा प्रारंभ मुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवर्जुन सांगितले. त्यानंतर श्री. राज वळवी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी मुंगमुळे यांनी फुलोरा शाळांचा आढावा घेतला. शाळा प्रारंभ मुक्त करण्यासाठी कृृती आराखडा तयार करून नियमीत अध्यापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे व नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे सांगितले. शिक्षण परिषदेचा उद्घाटनीय कार्यक्रम आटोपता घेत प्रत्यक्ष नियोजनानुसार तासिकेला सुरुवात करण्यात आली.

नियोजनानुसार प्रथम तासिका श्री. कोडापे फुलोरा तालुका समन्वयक यांनी घेतली. फुलोरा ॲप्स् व डॅस बोर्ड यासंदर्भात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी मार्गदर्शन केले. शिवाय फुलोरा कृती व शैक्षणिक साहित्य निर्मिती याबाबत विस्तृत माहिती दिली. दुसरी तासिका श्री. आर. कुमरे यांनी घेतली. फुलोरा उपक्रम विषय मराठी यामध्ये त्यानी चहा तयार करणे ही पाककृती घेतली. प्रत्यक्ष साहित्याच्याद्वारे चहा करणे व पाक कृतीचं लेखन कसे करावे याचे वर्गाध्यापन केले.

विश्रांतीनंतर लगेच तालुकास्तरीय गटसमन्वयक श्री. भुरसे यांनी ‘निपूण भारत’ या विषयावर आपली तासिका घेतली व विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच गोष्टीचा शनिवार या उपक्रमा बदल माहिती दिली. प्रत्येक शाळेत प्रभावीपणे हा उपक्रम कसा राबविला पाहिजे याबदल माहिती दिली. त्यानंतर शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा याबदल विद्यार्थ्यांच मार्गदर्शन कसे करावे व प्राविण्य पातळी कशी गाठावी याबदल श्री. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यामधील संकलित मूल्यमापन व आकारीत मुल्यमापन यासंदर्भाने माहिती श्री. समुद्रालवार यांनी दिली.

त्यानंतर सरल पोर्टलवरील आनलाईन कामे, यु डाईस अपडेट, शा. पो. आहार यासंदर्भात श्री. बावणे यांनी माहिती दिली. शेवटी श्री. बामनवाडे केंद्र प्रमुख यांनी प्रशासकीय बाबी हाताळल्या. शालेय अभिलेख अध्यावत करणेबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन हटवार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. मुंजम यांनी केले. यावेळी केंद्रातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.