कर आकारणी नोटीस तत्काळ रद्द करा

73

– राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली / १ डिसेंबर २०२२ : १७ नोव्हेंबर २०२२ रोजी नगर परिषद गडचिरोलीने शहरातील नागरिकांना नवीन घर कर (tax) आकारणी बाबतचे दिलेले नोटीस (notice) अन्यायकारक असून सदर कर आकारणी नोटीस तत्काळ रद्द करून सर्वसामान्य लोकांना परवडणारे नवे कर आकारणीबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रायुकाँँ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी (Collector) यांना निवेदन दिले.

 

१७ नोव्हेंबर २०२२ रोजी नगर परिषद गडचिरोलीने शहरातील नागरिकांना नवीन घर कर आकारणी बाबतचे नोटीस दिलेले आहे. या नोटीसमध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे कर लावून लोकांना अवाजवी कर भरण्यास सांगितले आहे. हे गडचिरोली शहर वासीयांवर अन्याय करणारे असून सदर कर आकारणी नोटीस तात्काळ रद्द करावे. या नोटीसातील विविध प्रकारच्या अवाजवी कर रचनेबाबत पुनर्विचार करून सर्वसामान्य गरीब लोकांना परवडेल अशी दुरुस्ती करावी. हे कर म्हणजे इंग्रजांच्या गुलामगिरीतील कररचनेची आठवण करून देणारे असून सध्या स्थितीमध्ये नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचे शासन नसताना नगर परिषद प्रशासनाने अशा प्रकारचे निर्णय घेणे अत्यंत दुदैर्वी आहे. सुधारित कर मूल्य निर्धारणाचे विवरण करताना नगरपरिषदेने महाराष्ट्र शासनाचा शिक्षण कर, रोजगार हमी उपकर, वृक्ष कर, अग्निशमन कर, विविध शिक्षण कर, दिवाबत्ती कर, उपयोगिता शुल्क कर, असे विविध प्रकारचे जाचक व जुलमी कर शहरवासीयांवर लादलेले आहे. यामुळे गडचिरोली शहरात नगर परिषदेच्या प्रशासनाच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालेला असून जोपर्यंत यात सुधारणा होत नाही. तोपर्यंत नागरिकांमधील असंतोष कमी होणार नाही हे स्पष्ट आहे. या असंतोषाचा उद्रेक होण्यापूर्वीच नगर परिषद प्रशासनाने सदर कर रचना नोटीस तत्काळ रद्द करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली शहराच्यावतीने करण्यात येत आहे.
या मागणीचा गांभीर्याने विचार करून हे कर आकारणी नोटीस तत्काळ रद्द करावे व सर्वसामान्य लोकांना परवडणारे नवे कर आकारणी करण्या अगोदर लोक जनसुनावणी घेऊन त्यानंतरच नवे कर लागू करावे अन्यथा या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोलीच्यावतीने मोठे आंदोलन उभारेल, याची दखल नगरपालिका प्रशासनाने घ्यावी.
यावेळी रायुकाँँ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, शहराध्यक्ष अमोल कुळमेथे, जिल्हा संघटक रंजीत रामटेके, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, विद्यार्थी शहर अध्यक्ष रितीक डोंगरे आदी उपस्थित होते.