निराधार योजनेचे अनुदान तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे : आमदार कृष्णा गजबे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

134

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील चार महिण्यांपासुन निराधार पेंशन योजनेचे अनुदान देण्यात न आल्याने निराधार, गोरगरीब अधिकच अडचणीत आल्याचे पाहु जाता निराधार पेंशन योजनेचे अनुदान तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाकडून केंद्र व राज्य शासनाचा हीस्सा मिळुन राज्यातील विधवा, परितक्त्या, अनाथ, निराधार व वयोवृद्ध गरीब गरजू नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आदी योजनांच्या माध्यमातून दरमहा अनुदान स्वरूपात मानधन देण्यात येते.
या अनुदानातून सदर लाभार्थी आपली तसेच आपल्या परिवाराची उपजिविका तसेच त्यांच्या आजारांवरील औषधोपचाराचा खर्च भागवितात. परंतु या योजनेच्या लाभार्थ्यांना माहे मार्च २०२२ पासून अनुदान देण्यात न आल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर येऊ लागली आहे. यास्तव आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी मुंबई येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समस्या अवगत करुन दिली असता मुख्यमंत्र्यांनी याबाबत जातीने लक्ष घालून येत्या सोमवारपर्यंत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना लाभार्थ्यांचे मागील ४ महीन्यांपासून थकीत असलेले अनुदान तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यामुळे एकुणच सदर योजनेच्या लाभार्थ्यांना निराधार पेंशन योजनेचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.