महानगरपालिकेतील सत्ता परिवर्तनानंतरच शहराचा सर्वांगीण विकास शक्य : आ. विजय वडेट्टीवार

110

– काँग्रेस पक्ष कार्यालय उद्घाटन व भूमिपूजन सोहळा

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : विकासाच्या नावावर केवळ थोतांड राजकारण करून सत्ता काबीज करणाऱ्या भाजपने शहरवासीयांचा केवळ भ्रमनिरासच केला. अशा थापाड्या सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवू. तसेच महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन करून शहराचा सर्वांगीण विकास साधण्या हेतू काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते रयतवारी कॉलरी येथे आयोजित युवक काँग्रेस पक्ष कार्यालय उद्घाटन तथा विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी प्रामुख्याने काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर , सुनिता लोढीया, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, शालीनी भगत, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, नंदू नागरकर, रामू तिवारी, युवक काँग्रेसचे रमिज शेख, मुन्ना तावाडे तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व बहुसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले की, शहरात बहुतांश प्रभागात पूरपरिस्थिती आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे सर्व जेष्ठ पदाधिकारी युवा कार्यकर्ते मदत कार्यात अहोरात्र मेहनत घेत असून शहरातील नागरिकांना दिलासा देत आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेवर सत्ता गाजविणाऱ्यांनी केवळ उद्घाटने आणि प्रसिद्धी व भ्रष्टाचार यातून अमृत योजनेचा डंका पिटला. मात्र आजही प्रभागातील नळांना पाणी येत नाही ही शोकांतिका आहे. आता शहराचा संपूर्ण विकास साधायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सोबतच शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस राजेश अडूर यांच्या रयतवारी कॉलरी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आ. वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. त्यासोबतच रयतवारी कॉलरीतील 55 लक्ष रुपयांचे सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन पार पडले.
यानंतर शहरातील तूकूम प्रभागातील अर्चना चिवडे यांचे सह निता खोब्रागडे, साधना दाते, गिरजा मांडवकर, शामली चिवंडे, रवीना रायपुरे, इंदुबाई, पचारे, रेखा नाकाडे, मुक्ता कामटकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पितांबर कश्यप, मुमताज सिद्दिकी, दौलत चालखुरे, तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी रयतवारी कॉलरी प्रभागातील माजी नगरसेवक तथा युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर व माजी नगरसेविका कलामती यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमस्थळी बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.