शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन करणार : आमदार डॉ. देवराव होळी

98

– चामोर्शी तहसील कार्यालयावरील शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चास चामोर्शी तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

गडचिरोली : मोर्चातील प्रमुख मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी येथे आज, 29 नोव्हेंबर रोजी आयोजित शेतकरी मोर्चास मार्गदर्शन करताना केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य गोरगरीब जनता व शेतकऱ्यांची प्रचंड लूट चालवली असून शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे हे सरकार असल्याचे प्रतिपादनही आमदार डॉ. होळी यांनी केले. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त असतानाच शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा विद्युतपुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देता खंडित करण्यात येत आहे. धानाला देण्यात येणारा बोनस यावर्षी नाकारण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या कळपा पाण्यात सापडल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. माञ अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची घोषणा अथवा भरपाई नाही. २०१९-२० अंतर्गत करण्यात आलेल्या धडक सिंचन विहिरींची थकीत बिल अजुनपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. घरकुल लाभार्थ्यांच्या प्रपत्र “ड” च्या यादीचे चुकीचे निरीक्षण करून अनेक गरजूंना घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी घोषित करण्यात आली. परंतु त्या घोषित कर्जमाफीनुसार जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी पासून वंचित ठेवण्यात आले आहे . राज्य सरकार शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य लोकांच्या जीवावर उठले असून या सरकारला जागे करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार डॉ. देवराव होळी यावेळी म्हणाले. या मोर्चातील या मागण्या लवकरात लवकर शासनाने मान्य न केल्यास शासनाच्या विरोधात आणखी मोठा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्निल वरघंटे, भाजपाचे जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, पंचायत समितीचे सभापती भाऊराव डोर्लीकर, उपसभापती वंदनाताई गौरकर, ओबीसी आघाडीचे महामंत्री भास्कर बुरे, आशिष पिपरे, चामोर्शी तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, तालुका महामंत्री संजय खेडेकर, भाजपा पदाधिकारी भाऊराव भगत, अतुल भीरपूरकर, बंगाली आघाडीचे नेते सुशांत रॉय, अनिता रॉय, भाजपाचे ज्येष्ठ नेते जयराम चलाख, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक राठी, जिल्हा कार्यकारणी सदस्य नीरज रामानुजनवार, जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा नरेश अल्सावार, ग्रामपंचायत सदस्य संजय चलाख, किशोर  गटकोजवार, प्रशांत सावकार पालरपवार, लक्ष्मणजी वासेकर, विकास मैत्र, राजू वरघंटीवार, भाऊजी दहेलकर, वासुदेव चिचघरे, विनोद किरमे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.