मार्कंडा देवस्थानच्या जीणोद्धाराचे काम थंडबस्त्यात

130

– पत्रकार परिषदेत मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली खंत

चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम मागील ६ वर्षापासून थंडबस्त्यात असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भाविक भक्तांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासाठी लोकप्रतिनिधीना, भारतीय पुरातत्व विभाग व प्रशासनाला वेळोवेळी भेटूनही अद्याप जीर्णोद्धाराचे काम पूर्ण न झाल्याने अखेर २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर व सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामूजी तीवाडे या पदाधिकार्‍यांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.
मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदमध्ये बोलताना सांगितले की, सन २०१५ पासून मंदिर खोलण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात २०१६ ला झाली. ५ वर्ष पूर्ण होऊनये काम अपूर्ण अवस्थेत असल्याने मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्यासह भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याची दिल्ली येथे भेट घेतली. दिल्लीवरून काम करण्याचे आदेश झाले. परंतु भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक नंदनी साहू यांची बदली झाल्याने काम थंड बस्त्यात पडले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष यांनी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितींजी गडकरी २० नोव्हेंबर २०२० ला भेट घेऊन मंदिर बांधकामासाठी निधीची मागणी केली, त्यावेळी त्यांनी काम सुरू करण्याचे निर्देश दिले परंतु काम सुरू झाले नाही. त्यासाठी पुन्हा देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी २१ नोव्हेंबर २०२१ ला योगा दिवशी नागपूर येते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन काम सुरू करण्याबाबत चर्चा केली. परंतु अजूनही जीर्णोद्धाराच्या अपूर्ण कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकारी यांना याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र मंदिर बांधकामाच्या कामाला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर यांनी पुरातत्व विभागाच्या रिजनल डायरेक्टर नंदनी शाहू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता मंदिर बांधकाम केले परंतु मंदिर बांधकामाचे जोडणी व्यवस्थित न केल्याने गळती होताना दिसत आहे. त्यामुळे सदर बांधकामाचे नव्याने टेंडर काढून परत जोडणी करावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगितले. जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले नसल्याने तीन महिन्यांनी येणाऱ्या मार्कंडा देवस्थान यात्रा दरम्यान शिवभक्तांना दुरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. अनेकांना देवदर्शनापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश राज्यात असलेल्या देवस्थानच्या विकासासाठी त्या भागातील लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन देवस्थानाचा विकास करतात. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करावे, अशी मागणी शेवटी पत्रकार परिषदेत देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केली.