राष्ट्र प्रथम भावनेतूनच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागेल : डॉ. शारदा महाजन

151

– नमाद महाविद्यालयात राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना सप्ताहनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

गोंदिया : स्वतःची ओळख जातीने, धर्माने, प्रदेशाने व इतर कशानेही न सांगता मी प्रथम भारतीय आहे, हे देशातील नागरिक जेव्हा सांगू लागतील त्यावेळी सांप्रदायिकता कमी होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागेल. देशाच्या विकासाला मारक सांप्रदायिकतेचे विष संपविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. देशातील प्रत्येक नागरिकाने संकुचित विचार सोडून देशहितासाठीचा विचार करावा. मी अमका, मी तमका, मी या जातीचा, त्या धर्माचा ही भावना त्यागावी लागेल. देश आहे तर मी आहे अन्यथा काही नाही. जगात केवळ भारताला विविधतेची देणं मिळाली आहे. विविधतेमुळे देशाची एकात्मता टिकून आहे. विविधता टिकवून ठेवण्याची भावना देशातील नागरिकांमध्ये वाढीस लागावी, असे प्रतिपादन नमाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शारदा महाजन यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नमाद महाविद्यालयात राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना सप्ताहनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्राचार्य डॉ. शारदा महाजन अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी प्राध्यापक डॉ. अर्चना जैन, डॉ. बबन मेश्राम, डॉ. एच. पी. पारधी, डॉ. किशोर वासनिक, डॉ. शशिकांत चौरे, प्रा. रितू तुरकर, डॉ. राजेश पटले उपस्थित होते. माता सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार देशात १९ ते २५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने नमाद महाविद्यालाच्या राज्यशात्र विभाग व राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता व आधुनिक काळात त्यासमोर येणारी आव्हाने या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. कोविड कालावधीनंतर महाविद्यालयात प्रत्यक्ष आयोजित होणारा हा पहिलाच कार्यक्रम होता. प्रत्येक स्पर्धकाने मिळालेल्या ३ मिनिटांच्या कालावधीत उत्कृष्ट मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांंनी व्यक्त केलेल्या मतावरून देशाचा येणार काळ निश्चितच उज्ज्वल आहे, असा निष्कर्ष परीक्षकांनी काढला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. योगेश भोयर व प्रा. घनशाम गेडेकर यांनी केले. या स्पर्धेत निखिल बनसोड याने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय मिथिलेश मेहर तर तृतीय गगन डोंगरे यांनी मिळविला. विजेत्यांना प्राचार्य डॉ. शारदा महाजन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. एच. पी. पारधी तर आभार डॉ. किशोर वासनिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ललिनी मेश्राम, कांचना गिरी, खुशबू भाटी, संगम रहांगडाले , गौरव कटरे, कपिल चिखलोंढे, चाहत मेश्राम यांनी परिश्रम घेतले.