– ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या घरकूल लाभार्थ्यांना घेतला आढावा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व ईतर घरकुल योजनेंतर्गत गरजू, गरीब लोकांची ग्रामपंचायतीच्या मार्फतीने मंजूर झालेली २२ हजार ३८२ घरकुल पंचायत समितीच्या ऑनलाईन प्रणाली “प्रपत्र ड” च्या यादीतून वगळण्यात आली. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना अपात्र करून घरकुलापासून वंचित ठेवण्यात आले . या अपात्र यादीची फेर पडताळणी करून त्यातून गरजू लोकांच्या घरकुलाची पात्रता यादी बनविण्यासंदर्भात शासन स्तरावर उचित कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पंधरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
ज्या लोकांना घरकुलाची अत्यंत आवश्यकता आहे अशा लोकांची घरकुलाची यादी ग्रामपंचायतीच्या सभेद्वारे पात्र करण्यात आली. परंतु पंचायत समितीद्वारे करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणालीतून यादी प्रक्रिया पूर्ण करताना अनेकांची नावे वगळण्यात आली. ज्या लोकांच्या एकाच परिवारामध्ये दोन घरं आहेत अशा लोकांना घरकुल मंजूर करण्यात आल्याच्या अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. यामुळे गरजू लाभार्थ्यांवर प्रचंड अन्याय झालेला आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या “प्रपत्र ड” यादी मधून वगळण्यात आलेल्या जिल्हयातील २२ हजार ३८२ अपात्र घरकुल लाभार्थ्यांच्या यादीची फेर पडताळणी करून आवश्यक असणाऱ्या गरजू लाभार्थ्यांना पात्र करून लाभ देण्यास्तव शासन स्तरावरून उचित कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी यावेळी दिले.