त्रूटी दूर करुन अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा : खा. अशोक नेते यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

95

– गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया : देवरी ते आमगाव, आमगाव ते गोंदिया तसेच देवरी- चिचगड- कोरची या महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे. तसेच आमगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणावर अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अपूर्ण कामे यथाशिग्रह मार्गी लावून अतिक्रमणावर तातडीने तोडगा काढून राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी दिले.
खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली दि. 28 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिप बांधकाम विभाग व अन्य अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रामुख्याने ब्रम्हपुरीचे माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर, आमगावचे शहर अध्यक्ष घनश्यामजी अग्रवाल, भाजपचे यशवंत मानकर, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, भाजयुमोचे प्रदेश सदस्य हितेश डोंगरे, जिल्हा नियोजन अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, उपकार्यकारी अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते.

बाम्हणी रस्ता तसेच सालेकसा तालुक्यातील धानोली रेल्वे स्टेशन वरील अंडर ब्रिज यासंदर्भात असलेल्या अडचणी दूर करून या कामाचे प्रस्ताव तातडीने रेल्वे विभाग व वरिष्ठांकडे सादर करून सदर काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. तसेच आमगाव नगरपंचायत अंतर्गत विकासकामे यथाशिग्र पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थानच्या विकासासाठी केन्द्र शासनाकडून 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या निधीतून कचारगड तीर्थक्षेत्रतील विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले.