– आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली पुलाची पाहणी
– कंत्राटदारासह सार्वजनिक बांधकाम विभाग २ च्या कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांसह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वित्तमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राजोली गावाजवळील कठाणी नदीवर पुरात अर्धवट वाहून गेलेल्या पुलियाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले असून हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याने सदर कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंत्यांसह संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या पुलाची पाहणी करताना केली.
आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आज या पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. पुलाच्या कामाला जोडून असलेल्या रस्ता अत्यंत खराब झालेला असून त्यामुळे हा पूल पुन्हा वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी पावसाच्या पाण्याने सदर पुलिया वाहून गेल्याने या भागातील नागरिकांना प्रचंड अडचण निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पाठपुरावा करून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व वित्त मंत्री यांच्या सहकार्याने या पुलाच्या बांधकामाकरिता निधी मिळवून दिला. मात्र पुलाचे नवीन बांधकाम करताना या कामामध्ये प्रचंड गैरव्यवहार करण्यात आला. सदर बांधकाम निकृष्ट झाले असून यामुळे पुढेही पुल वाहून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्या कंत्राटदारास सह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या पुलाच्या पाहणीच्या वेळी केली.