आदिवासी कंवर समाजाचे 10 जोडपे विवाहबद्ध

32

– सामूहिक विवाह सोहळ्याचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोरची तालुक्यातील मोहगाव येथे आदिवासी कंवर समाजाचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या सामूहिक विवाहामध्ये एकूण 10 जोडपे विवाहबद्ध झाले.

सदर कार्यक्रमाची सुरुवात कंवर समाजाच्या रीतिरिवाजाने सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर सामूहिक विवाह सोहळ्यात अध्यक्ष म्हणून म.रा.आ.वी.म. नासिकचे संचालक भरत दूधनांग उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, क्षेत्र अध्यक्ष आदिवासी कवर समाज भिकम फुलकवर, देवरी येथील पंचायत समिती सभापती अबिंकाताई बंजार, प्रा. देवराव गजभिये, प्रा. गणेश सोंनकलंगी, राधेश्याम फुलकुवर, पितांबर आरूदुल्ला, चेतन जमकातन, माजी जि. प. सदस्य पदमाकर मानकर, रुखमन घाटघुमर, नगरसेवक मेघश्याम जमकातन, आशिष अग्रवाल, सून्हेर सोंनटापर, लग्णूराम कार्यपाल, प्रेमशिंग जमकातन, फिरोज फुलकवर व इतर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे जनक सीताराम कंवर, बाबुराव शेडमाके व विर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून विधिवत पूजा अर्चना करून करण्यात आली. या सामूहिक विवाहाने निसर्गाचे रक्षण केले जात असून पैश्याची व वेळेची सुध्धा बचत केली जात आहे. सर्व कवर समाज हे एकत्र येण्याचे सुध्दा हे माध्यम असल्याचे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या उद्घघटनिय भाषणात केले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता कंवर समाजाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.