माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम बनले ‘नि-क्षय मित्र’

6

– राजेंच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहार वाटप, क्षयरुग्नांची स्विकारले पालकत्व

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १९ ऑगस्ट : अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात नोंद झालेल्या क्षय रुग्णांना प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत बनलेले ‘नि-क्षय मित्र’ माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून तीन क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी तालुक्यातील तीन क्षयरोग पीडितांना माजी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पुढील सहा महिने रुग्णांना दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारले आणि त्यांच्या हस्ते पोषण आहार किट वाटप करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने तालुका क्षयरोग पर्यवेक्षक विजय पोरेड्डीवार, आरोग्य सेविका पी. डी. पेंदाम, सामाजिक कार्यकर्ते पंकज नौनुरवार तसेच गावातील महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रपतींनी नि-क्षय मित्र उपक्रम सुरू केला. या अंतर्गत क्षयरोगावर उपचार घेत असलेल्यांना अतिरिक्त निदान, पोषण आणि व्यावसायिक मदत सुनिश्चित केली जाते. हे रुग्ण पूर्णपणे बरे व्हावेत या दृष्टीने मदत करण्यासाठी लोक प्रतिनिधी, कॉर्पोरेट, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक व्यक्तींनी दाता म्हणून पुढे यावे, असे आवाहन राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले. क्षयरुग्णाना उत्तम उपचार मिळवत यासाठी अतिरिक्त रुग्ण सहाय्य पुरवते तसेच २०२५ पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा लाभ उठवण्यासाठी समाजाचा सहभाग वाढवण्यात मदत करेल.

नि-क्षय पोर्टलवर जवळजवळ देशात 13.5 लाख क्षयरोग रुग्णांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 8.9 लाख क्षयरोग रुग्णांनी दत्तक योजनेसाठी आपली अनुमती आहे. नि-क्षय डिजिटल पोर्टल क्षयरोग ग्रस्तांना समुदायाचा आधार मिळवून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणार आहेत. या योजनेपासून एकही क्षय-रुग्ण वंचित राहू नये यासाठी सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट आस्थापना, लोकनियुक्त प्रतिनिधी आदींनी नि-क्षय मित्र बनून या चळवळीला पाठींबा द्यावा आणि या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी मेळावे आयोजित करावेत. त्यात अहेरी तालुका आरोग्य विभागाचे सहकार्य असेल, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांनी केले.