विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, १८ ऑगस्ट : देशाचे पंतप्रधान म्हणून राहूल गांधी यांना बघायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपसी मतभेद बाजुला सारून पक्ष संघटन मजबूत करण्यात येणार असून आगामी लोकसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवून जिंकणार आहोत, असे प्रतिपादन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे निरीक्षक आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आज येथील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
लोकसभा निवडणुकीबाबत आढावा बैठक घेण्यासाठी ते गडचिरोली येथे आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणी सुरू केली असून कार्यकर्ते सुद्धा जोमाने कामाला लागले असल्याचे निरीक्षक डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
या जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पाच्या अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र अद्यापही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. पूरपरिस्थितीमुळे शेती खरडून निघालेली आहे. शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असून अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असल्याचा आरोपही निरीक्षक राऊत यांनी केला आहे. या जिल्ह्यात ओबीसींची संख्या अधिक आहे. मात्र या प्रवर्गाच्या आरक्षण व जनगणनेचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र याकडे स्थानिक विद्यमान लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे डॉ. नितीन राऊत यावेळी म्हणाले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, पेंटारामा तलांडी, अविनाश वारजूकर, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, डॉ. नितीन कोडवते, माजी नगरसेवक सतीश विधाते, युवा नेते विश्वजीत कोवासे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.