पुरामुळे गडचिरोलीतील संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

73

–  कोठी कोरनार येथे वीर बाबुराव शेडमाके पुलाचे लोकार्पण

– शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस जवानांचा सत्कार

–  पाच मोबाईल टॉवरचे लोकार्पण व स्थानिकांशी ऑनलाईन संवाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अनेक विकास कामांचे लोकार्पण केले. गडचिरोलीच्या इतिहासात कोठी कोरनार या अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जाणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच वरिष्ठ लोकप्रतिनिधी आहेत. कोठी – कोरणार येथे वीर बाबुराव शेडमाके पुलाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलामुळे छत्तीसगड राज्य तसेच 17 गावांना जोडण्यात येत आहे. पावसाळ्यात संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सुरजागड येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिना, पोलीस अधीक्षक निलोत्पल, लॉयड मेटलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन आदी उपस्थित होते.

संपर्क तुटणारी 17 गावे कोठी – कोरणार या पुलामुळे जोडण्यात येत आहेत, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात तीन-चार महिने ही गावे कटअप असायची. या गावात शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि अन्नधान्य पोहोचविणे शक्य नव्हते. मात्र आता या पुलामुळे ही 17 तारखे कायमची संपर्कात राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व गावे बारमाही रस्त्याने जोडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच घेण्यात आला. संपर्क तुटणाऱ्या गावांना पूलाने किंवा बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथील आदिवासी संस्कृती आणि परंपरा पर्यावरणपूरक आहेत. त्याचे जतन करूनच जिल्ह्याचा विकास करण्यात येईल. पर्यावरणपूरक खनिजामुळे गडचिरोलीत समृद्धी येईल. पर्यावरणाचे रक्षण करून व स्थानिकांच्या समस्या लक्षात घेऊन प्रभाकरण यांनी लॉयड मेटलची सुरुवात केली आहे. कोनसरीला लॉयड मेटलला नवीन जागा देण्यात आली असून त्याचे भूमिपूजन सुद्धा करण्यात आले आहे. गडचिरोलीत 20 हजार कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे .त्यामुळे येथील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. खनिज वाहतूक आराखड्याला मान्यता देण्यात येईल. वाहतुकीचा एक चांगला कॉरिडॉर जिल्ह्यात उभा करण्याचा आपला प्रयत्न आहे. सुरजागड येथून निघणारे खनिज यावर पहिला हक्क गडचिरोलीचा असून उद्योग उभारणी संदर्भात सर्वात पहिले जिल्ह्याचा व नंतर विदर्भाचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अहेरी येथील जिल्हा पोलीस संकुलात कॅन्टीन, वाचनालय, उद्यानाचे उद्घाटन

अहेरी येथील जिल्हा पोलीस संकुलात कॅन्टीन, वाचनालय, उद्यान आदींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पोलीस उप मुख्यालय प्राणहिता येथे शौर्य पुरस्कारप्राप्त पोलीस जवानांचा त्यांच्या हस्ते सत्कारसुद्धा करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, यावर्षी गडचिरोलीतील एकूण 62 जणांना पदक प्राप्त झाले.
यातील 33 जवानांना शौर्य पुरस्कार प्राप्त झाल्याने गडचिरोली पोलिसांची मान उंचावली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकशाहीच्या रक्षणाकरिता दुर्गम, डोंगराळ भागात पोलीस जवान आपले कर्तव्य पार पाडत असतात. हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे. धानोरा उपविभाग अंतर्गत मरदीनटोला येथे 13 नोव्हेंबर 2021 रोजी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत माओवाद्यांचे वरिष्ठ कॅडर असलेले व इतर असे एकूण 27 नक्षलवादी ठार झाले होते. देशविघातक शक्तीचे गडचिरोली पोलिसांनी कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. याची दखल केंद्र सरकारने घेऊन 33 जवानांना शौर्य पथकाने सन्मानित केले. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून अनेक उपक्रम जनतेसाठी राबविण्यात येत आहे. पोलिसांप्रती मैत्रीची भावना समाजात वाढत असल्यामुळे नक्षलवाद्यांना मिळणारा लोकल सपोर्ट संपला आहे. हे सरकार गडचिरोली पोलिसांच्या तसेच येथील नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. पोलिसांना दीडपट वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दरवर्षी जीआर काढण्याची गरज राहणार नाही. पुढे ते म्हणाले, आज येथे पाच एअरटेल मोबाइलच्या टॉवरचे लोकार्पण करण्यात आले. या टावरच्या कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी दुर्गम भागात पोहोचण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यात विविध कंपन्यांचे एकूण 450 टॉवर उभारण्यात येणार आहे. सध्यास्थितीत यातील 40
टॉवर पूर्ण झाले असून उर्वरित टॉवर लवकरात लवकर उभे करण्यासाठी संबंधित मोबाईल कंपन्यांना निर्देश देण्यात येतील. कनेक्टिव्हिटीमुळे गडचिरोलीच्या विकासाची गती वाढेल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने स्थानिक नागरिकांची संवाद साधला तसेच प्राणहिता मुख्यालयात असलेल्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.