सिकलसेल रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घ्यावा : प्रमोद पिपरे

60

– गडचिरोली येथे सिकलसेल निर्मुलन अभियानाचा शुभारंभ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सिकलसेल रुग्णासाठी शासनाने मोफत औषधोपचार देण्याचा निर्णय घेतला असून सिकलसेल रुग्णांना उपचार करण्याकरिता सिकलसेल कार्डाचे वाटप करण्यात येत आहे. तसेच सिकलसेल रुग्णांना रुग्णालयातील सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे अशा सर्व रुग्णांची नोंद प्रधानमंत्री आयुष्यमान जनआरोग्य योजना गोल्डन कार्डमध्ये करण्यात येणार असून त्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी सर्व सिकलसेल रुग्णांनी मोफत औषधोपचार योजनेचा लाभ घ्यावा व नागरिकांनीही न घाबरता सिकलसेलची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी केले. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात सिकलसेल निर्मुलन अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशमधील शहाडोल जिल्ह्यात सिकलसेल निर्मूलन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्याच धर्तीवर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाचा शुभारंभ व सिकलसेल रुग्णांना उपचार करण्यासाठी कार्ड वाटप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोळंखी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, हेमंत जंबेवार, कविता उरकुडे, ज्योती बागडे, अनिता मडावी, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, डॉ. माधुरी किलनाके, डॉ. विनोद म्हशाखेत्री, डॉ. पंकज हेमके, डॉ. दीक्षांत मेश्राम, डॉ. चकोर रोकडे, डॉ. मुकुंद डबाले उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश सोळंखी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड व सिकलसेल रुग्णांना उपचार करण्यासाठी कार्डचे वाटप करण्यात आले. संचालन प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजय ठाकरे यांनी केले तर आभार डॉ. धुर्वे यांनी मानले.