संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सवात संजय कुनघाडकर यांच्या ‘जयगीत’ काव्यसंग्रहाचे लोकार्पण

156

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी, ९ डिसेंबर २०२२ : संताजी स्नेही मंडळ चामोर्शीच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज (santaji jagnade maharaj) यांचा ३९८ वा जयंती उत्सव नगरपंचायत कार्यालय चामोर्शीच्या बाजार चौकात समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक संजय येरणे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथील निवृत्त प्राध्यापक रमेश पिसे हे होते. या जयंती उत्सव कार्यक्रमात श्री. संजय कुनघाडकर लिखित ‘जयगीत’ या काव्यसंग्रहाचे लोकार्पण समाज बांधवांच्या साक्षीने करण्यात आले.
‘जयगीत’ काव्यसंग्रह ग्रामीण जीवनाचे गीत गाणारा कवितासंग्रह असून त्यात कवींनी सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अशा सर्वच अंगांना स्पर्श केलेला असून निसर्ग कविता, प्रेम कविता, स्त्री समस्या, शेती, शेतकरी आणि लोकगीतांची सुद्धा रेलचेल आहे. हा लोकार्पण सोहळा जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय येरणे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. रमेश पिसे, मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवाजी बुरांडे, नगरसेवक निकुभाऊ नैताम, नगरसेवक आशिष भाऊ पिपरे, नगरसेविका सोनालीताई पिपरे, नगरसेविका काजल नैताम, नगरसेविकास स्नेहाताई सातपुते, जयगीत काव्यसंग्रहाचे कवी संजय कुनघाडकर, त्यांच्या सौभाग्यवती संगीता कुनघाडकर यांच्या हस्ते ‘जयगीत’ काव्यसंग्रहाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजाननराव बारसागडे यांनी केले. प्रास्ताविक नगरसेवक राहुलभाऊ नैताम यांनी तर आभार प्रदर्शन श्री. संजय कुनघाडकर यांनी केले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.