मुनघाटे महाविद्यालयाच्या ‘मृदगंध’ला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर

125
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या उद्देशाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लेखन कलेला वाव मिळावा म्हणून दरवर्षी ‘मृदगंध’ वार्षिकांक प्रकाशित करण्यात येतो. कुरखेडा येथील मुनघाटे महाविद्यालयाच्या सत्र 2020-21 च्या ‘मृदगंध’ या वार्षिकांकास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईद्वारा आयोजित यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा 2021 चा सर्वोत्कृष्ट वार्षिकांकचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एक चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.
महाविद्यालयीन युवकांमध्ये साहित्याबद्दल आवड आणि पुरोगामी विचारसरणी व सकारात्मकता निर्माण व्हावी, आधुनिक पिढीच्या, युवा विश्‍वाच्या भावभावना व विचार हे लेख व कवितांच्या माध्यमातून लिहिणार्‍यांमधून भावी साहित्यिक निर्माण व्हावे, त्यांच्यातील लेखन कलागुणांना चालना मिळावी या हेतूने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई द्वारा नवमहाराष्ट्र युवा अभियाना अंतर्गत दरवर्षी राज्यस्तरीय  महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यात श्री. गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या मृदगंध वार्षिकांकाने प्रथम पुरस्काराचे घवघवीत यश संपादन करीत महाविद्यालयाबरोबरच गोंडवाना विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घातली आहे. गोंडवाना विद्यापीठात असा पुरस्कार प्राप्त करणारे श्री. गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय हे पहिले मानकरी ठरले आहे.
मुनघाटे महाविद्यालय हे जिल्हा मुख्यालयापासून लांब अंतरावर असूनही विद्यार्थ्यांमधील लेखन कलेचा अविष्कार मृदगंध या वार्षिकांकात दिसून येते. कोरोना हा मुख्य विषय घेऊन यावर्षीच्या वार्षिकांकाची निर्मिती करण्यात आली. यात विद्यार्थ्यांचे इंग्रजी, मराठी व हिंदी या तिन्ही भाषेतील दर्जेदार लेख व कवितांचा समावेश केलेला आहे. वार्षिकांकाचे आकर्षक मुखपृष्ठ, दर्जेदार बांधणी व रंगीत चित्र यांचा अंतर्भाव सदर वार्षिकांकात केलेला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मुख्य संपादक डॉ. दशरथ आदे, संपादक मंडळातील डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. भास्कर तुपटे, डॉ. गुणवंत वडपल्लीवार, आशिष बगमारे, सतीश मुनघाटे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रगती मेश्राम व दिव्या डोकरमारे यांनी सदर अंक निर्मितीचे कार्य केले.
महाविद्यालयाच्या मृदगंधला गोंडवाना विद्यापीठाचा 2017-18 पासून 2020-21 असा सतत 4 वर्षे प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. तर यापूर्वी अनेकवेळा गोंडवाना विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरद्वारे उत्कृष्ट वार्षिकांक म्हणून गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे हितचिंतक तसेच पालक वर्ग, माजी विद्यार्थी, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थीवर्गाने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.