विद्यापीठाच्या इमारतीमधून जिल्ह्यातील संस्कृतीचं प्रतिबिंब दिसावे : कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

161

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाला 200 एकराचा परिसर लाभणार असून या परिसरात उभ्या राहणाऱ्या प्रत्येक इमारतीमधून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील संस्कृतीचं प्रतिबिंब दिसावे, अशाच प्रकारच्या इमारती उभ्या करण्यासाठी व विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सर्वांची साथ मला हवी असल्याचे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी. ‘अधी सभा सदस्यांची सदिच्छा भेट’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत बैठकीला उपस्थित सदस्यांना संबोधितांना व्यक्त केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल चिताळे, सिनेट सदस्य एडवोकेट गोविंद भेंडारकर, प्रा. संध्या येलेकर, प्रा. प्रशांत ठाकरे, डॉ. संदीप लांजेवार व सामाजिक कार्यकर्ते प्रा. शेषराव येलेकर उपस्थित होते. कुलगुरू पुढे म्हणाले, येथील वनसंपदा व नैसर्गिक संसाधनांवर आधारित पारंपारिक शिक्षणासह व्यवसायिक व जागतिक पातळीचे कौशल्य युक्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण कमीत कमी खर्चात उपलब्ध करून देऊन येथील लोकांचा विकास साधणे हे गोंडवाना विद्यापीठात च्या स्थापनेचा उद्देश आहे. गोंडवाना विद्यापीठाला आता 200 एकराचा परिसर उपलब्ध होणार असून विद्यापीठाचा उद्देश सफल व्हावा यासाठी प्रत्येक सिनेट सदस्यांचे या संदर्भात काय व्हिजन आहे हे जाणून घेण्यासाठी तीन ते चार सिनेट सदस्यांचा एक गट याप्रमाणे बैठकीचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या दोन्ही जिल्ह्यातील मुले मैदानी खेळ व अथलेटिक्समध्ये देशात पुढे आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठ परिसरात १५ एकर मध्ये सर्व सोयीसुविधा युक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील झाडीपट्टी कलानाट्य संस्कृती महाराष्ट्रात अव्वल आहे. यात स्थानिक कलाकारांना वाव मिळावा म्हणून झाडीपट्टी वर आधारित कलाकृतीची व चित्रपटाची निर्मिती येथेच व्हावी अशा प्रकारची अद्ययावत व्यवस्था येथेच निर्माण करण्याचे आणि त्याचाच एक भाग म्हणून दीड ते दोन हजार आसन क्षमतेचे नाट्य-चित्रपट गृह येथे निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
गोंडवाना विद्यापीठ हे केवळ परीक्षा घेणारं व निकाल लावणारं केंद्र न राहता येथील संस्कृती, भाषा व समाजव्यवस्था यावर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचं अध्यासन केंद्र व्हावे जेणेकरून देश-विदेशातील विद्यार्थी येथे येऊन अध्ययन व संशोधन करतील. असा आशावाद सिनेट सदस्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात बांबूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते, बांबू मध्ये देशाची अर्थव्यवस्था बदलविण्याची क्षमता आहे. म्हणून विद्यापीठात बांबू संशोधन केंद्र निर्माण व्हावे आणि बांबूवर आधारित पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू व्हावेत असा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी अधिसभा सभेत मी सादर केल्याचे प्रा. संध्या येलेकर यांनी सांगितले. त्यानुसार विद्यापीठात बांबू संशोधन केंद्र सुरू झाले. आता हे केंद्र नावापुरते न राहता या केंद्रामार्फत जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या बांबूच्या प्रजाती विकसित कराव्यात, बांबू हा प्लास्टिकला पर्याय व पर्यावरणपूरक असल्यामुळे यातून नाविन्यपूर्ण कलाकृतीची निर्मिती व्हावी तसेच केंद्रसरकार बांबूपासून बायो सीएनजी व इथनाल निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी दोन लक्ष कोटीची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. बांबू संशोधन केंद्रामार्फत असा एखादा बायो सीएनजी निर्मित प्रकल्प उभा करून या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करता येईल का ? या दिशेने विद्यापीठाने विचार करावा असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्वतः तयार केलेली पेंटिंग कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला. एक चांगला उपक्रम राबविल्याबद्दल सर्व सिनेट सदस्यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे अभिनंदन केले.