आत्मसमर्पित जोडप्यांसह 117 जोडपी झाली विवाहबद्ध

142
– गडचिरोली पोलिस दल व नागपूर मैत्री परिवार संस्थेचा संयुक्त उपक्रम
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी उपवर-वधू यांना नवजीवनाची सुरुवात करुन देण्याकरिता आण आदिवासी बांधवांची संस्कृती जोपासण्याकरिता गडचिरोली पोलिस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस दल व मैत्री परिवार संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मूल मार्गावरील अभिनव लॉन येथे 13 मार्च रोजी भव्य आदिवासी विवाह सोहळा पार पडला. यावेळी 16 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह 117 जोडपी विवाहबद्ध  झाली. अतिशय शिस्तबद्ध व नियाजनबद्ध या विवाह  सोहळ्याचे गडचिरोलीकरांनी तोंडभरून कौतूक केले.
117 जोडपी, त्यांचे नातेवाईक, गावकरी, आमंत्रित अशा सुमारे तीन हजारांंवर उपस्थित लोकांनी सामूहिक विवाहाचा भव्य मंडप फुलून गेला होता. रविवारी सकाळी सहा वाजताच लग्न मंडपात लगबग सुरू झाली होती. वर-वधू नटूनथटून बसले होते तर भूमक विवाह विधीची तयारी करण्यात व्यस्त होते. आठ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. बँडबाज्यांसह सुमारे अडीच किलोमीटर फिरून आल्यानंतर बरोबर दहा वाजता मुहूर्तावर भुमकांच्या मंत्रोच्चारात विवाह विधी पार पडला.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजभे, गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधिक्षक (अभियान) सोमय मुंडे, एसडीपीओ प्रनिल गिल्डा, नागरी कृती शाखेचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, सामाजिक कायकर्ते व गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. शिवनाथ कुंभारे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, मैत्री परिवारचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, बाळासाहेब वरखेडे, सुनील चिलेकर, निरंजन वासेकर, घिसुलाल काबरा, डॉ. उपेंद्र कोठेकर, पंडित पुडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडचिरोली जिल्हा हा नक्षली कारवायांसाठी ओळखला जातो. अतिसंवेदलशील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना घडत असतात. अशा नक्षली कारावायांना आळा घालण्यासाठी एकीकडे पोलिस विभाग प्रयत्न करीत असून दुसरीकडे पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या जीवनविकासासाठी सातत्याने झटत आहे. हे आदिवासी आमचेच कुटुंबिय असून त्यांना मदत करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे म्हणत पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी नवविवाहित जोडप्यांना सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकातून प्रा. संजय भेंडे यांनी मैत्री परिवारच्या कार्याचा आढावा घेतला व सामूहिक विवाहाबाबत विस्तृत माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते नवदाम्पत्यांना झोननिहाय संसारोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. माधुरी यावलकर व महादेव शेलार यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रनिल गिल्डा यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, अंमलदार, इतर शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार, नियोजित पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन व पोलिस मदत केंद्राचे सर्व प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी सहकार्य केले.