महाविकास आघाडी सरकारच्या अन्यायकारक धोरणामुळे सर्वसामान्य जनतेची दिवाळी अंधारात – आ. डॉ. देवराव होळी

96

– राज्यातील जनतेचा विश्वासघात करणाऱ्या ठाकरे सरकारचा केला निषेध

– शेतकऱ्यांना घोषित केलेली कर्जमाफी अजूनही मिळाली नाही ही शोकांतिका

गडचिराेली : राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी मजुर, सर्वसामान्य लोकांची फसवणुक केली असून त्यांच्या अन्यायकारक धोरणामुळे सर्वसामान्य जनतेची दिवाळी अंधारात गेली आहे. त्यामुळे ही काळी दिवाळी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथिल स्थानिक इंदिरा गांधी चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाप्रसंगी केले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेचा विश्वासघात करणाऱ्या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध केला. या आंदोलानाप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रमोद पिपरे, नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेश भुरसे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, धानोरा तालुका प्रभारी अनिल पोहनकर, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, श्याम वाढई, राजु शेरकी, दिनेश आकरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे सातबारे कोरे करू असे आश्वासन दिले. कर्जमाफीची घोषणा होऊन २ वर्षे होत आहेत. परंतु राज्यातील आघाडी सरकारने अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम टाकलेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. कर्जामुळे त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे विजेचे दर प्रचंड वाढविले, शेतीला वीज नाही, दुसरीकडे सर्वसामान्य जनतेची वीज कापण्याची मोहीम या नाकर्त्या सरकारने सुरू केलेली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला या सरकारने अंधारात टाकले असून शेतकरी शेतमजूर यांची दिवाळी काळी झालेली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द रद्द झाले. त्यामुळे या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी याप्रसंगी केले.