नुकसान भरपाई न दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात – नगराध्यक्ष योगिताताई पिपरे

82

– भारतीय जनता पार्टीतर्फे मुक्या, बहिऱ्या व आंधळ्या महाविकास आघाडी सरकारचा केला निषेध

– महामहिम राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांना दिले निवेदन

गडचिरोली : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे सातबारे कोरे करू असे आश्वासन दिले. कर्जमाफीची घोषणा होऊन २ वर्षे होत आहेत. परंतु राज्यातील आघाडी सरकारने अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम टाकलेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. कर्जामुळे त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे विजेचे दर प्रचंड वाढविले, शेतीला वीज नाही, दुसरीकडे सर्वसामान्य जनतेची वीज कापण्याची मोहीम या नाकर्त्या सरकारने सुरू केलेली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला या सरकारने अंधारात टाकले असून शेतकरी शेतमजूर यांची दिवाळी काळी झालेली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द रद्द झाले. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन अजूनपर्यंत या मुक्या, बहिऱ्या व आंधळ्या सरकारने नुकसान भरपाईची रक्कम शेतकरयांना दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जात आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी आज स्थानिक इंदिरा गांधी चौकात आयोजित आंदोलनाप्रसंगी केले. त्यामुळे या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे प्रतिपादनही नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी याप्रसंगी केले. यावेळी तहसीलदार गणवीर गडचिरोली यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल मा. भगतसिंहजी कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलानाप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, गोविंद सारडा, किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेश भुरसे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, धानोरा तालुका प्रभारी अनिल पोहनकर, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर कुंभरे,महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे,पूनम हेमके, श्याम वाढई, राजु शेरकी, दिनेश आकरे, नरेश हजारे, दत्तु माकोडे, जनार्धन भांडेकर, सुधाकर बाबनवाडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.