ब्रम्हपुरी येथे एस. टी. वाहतूक नियंत्रकाची विषप्राशन करून आत्महत्या

173

चंद्रपूर : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून संपादरम्यान एका कर्मचाऱ्याने एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच सोमवार, ८ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे
एका एस. टी. वाहतूक नियंत्रकाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सत्यजित ठाकूर असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. ब्रम्हपुरी शहरातील प्रमुख आगारामध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून सत्यजित ठाकूर कार्यरत असून ते 34 वर्षांंचे होते. त्यांना चार महिण्याची मुलगी आहे. त्यांची पत्नी नागपूरला राहते. दोन दिवसापूर्वीच ते ब्रम्हपुरीला आले होते. पतीचा फोन बंद असल्याने त्यांनी त्याच्या सहका-यांना काॅल केले. सहका-यांनी घरी जाऊन पाहिले असता सत्यजीत ठाकूर यांनी घरी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्याने विष प्राशन करून जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सत्यजीत ठाकूर हे चार महिन्यापूर्वीच ब्रम्हपुरी आगारात बदलून आले होते. ते मुळचे नागपूर येथील निवासी आहेत. ब्रम्हपुरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठविला आहे. पोलिस तपासाअंती मृत्यूचे कारण पुढे येणार आहे. एस. टी. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारला असतानाच आत्महत्येच्या या घटनेनं कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याआधी अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नुकतीच एका कर्मचाऱ्याने एसटीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ताजी सताना ब्रम्हपुरी मध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.