Home Breaking News २३ व २४ ऑक्टोबरला गडचिरोलीत भव्य आदिवासी मेळावा व सांस्कृतिक स्पर्धा

२३ व २४ ऑक्टोबरला गडचिरोलीत भव्य आदिवासी मेळावा व सांस्कृतिक स्पर्धा

203

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : २३ व २४ ऑक्टोबर गडचिरोली येथील चांदाडा रोडवरील गोटुल भूमी येथे भव्य आदिवासी मेळावा, देवी-देवतांचे महापूजा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी व गोटूल समिती गडचिरोलीचे अध्यक्ष नंदू नरोटे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला प्रणाली मडावी, लक्ष्मी कनाके, जयश्री येरमे, (नारी शक्ती संघटना), ज्योत्सना येरमे, मयुरी हलामी, विनय सेडमाके, राजेश कोरमी, शिवाणी, संजया गवळी, पूनम हलामी, कांता कुंडली आदी आदिवासी विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

२३ ऑक्टोबरला पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व ग्रामसभाचे सक्षमीकरण व बांबू व्यवस्थापन याविषयी पेसा क्षेत्रातील ग्रामसभाचे अध्यक्ष सचिव व सदस्य यांचे मार्गदर्शन राहणार आहे. मार्गदर्शनात जेष्ठ समाजसेवक देवाजी तोफा, आदिवासी विकास विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, नागपूर विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. शाम कोरेटी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्रा. नरेश मडावी, मिशन आयएएस अकॅडमी अमरावती डॉ. नरेशचंद्र काठोळे, आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

दुसऱ्या सत्रात दुपारी १ वाजता जिल्हास्तरीय आदिवासी व मेळाव्याला सुरुवात होणार आहे. आदिवासी मेळाव्याचे उद्घाटक राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार लाभणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आविस सरसेनापती तथा गोटूल समिती गडचिरोलीचे अध्यक्ष नंदू नरोटे तथा कार्यक्रमाचे आयोजक व सत्कारमूर्ती आमदार डॉ. देवराव होळी असणार आहेत.

तिसऱ्या सत्रात दुपारी ४ वाजता आदिवासी मधील देव पद्धती ४, ५, ६, ७, ११, १२ देव व स्वातंत्र्य संग्राममध्ये जनजातीनायकांचा योगदान यावर नागपूर विद्यापीठ नागपूरचे प्रा. शाम. कोरेटी यांचे मार्गदर्शन लागणार आहे. त्याच दिवशी रात्री ७ वाजता आदिवासी संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत व रात्री ११ वाजता बक्षीस वितरण होणार आहे. २४ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता आदिवासी देवदेवतांची महापूजा गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून सहउद्घाटक म्हणून देवरी निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम व गोटूल समितीचे उपाध्यक्ष देवाजी तोफा हे असणार आहेत. आदिवासी देवी देवतांचे गोटूल भूमी चांदाळा रोड गडचिरोली येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थी संघटना गडचिरोली पदाधिकारी व कार्यकर्ते, ऑल इंडिया आदिवासी इम्पॉस फेडरेशन गडचिरोली, आदिवासी हलबा- हलबी समाज संघटना गडचिरोली, आदिवासी गोंड गोवारी समाज गडचिरोली, आदिवासी समाज प्रधान संघटना गडचिरोली, आदिवासी कवर समाज संघटना गडचिरोली, बिरसा मुंडा स्मारक समिती, बिरसा सेना व जिल्ह्यातील गोठुल समितीचे पदाधिकारी व सदस्यगण यांचे मोलाचे योगदान राहणार आहे. सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील आदिवासी जनतेने एकत्र येऊन अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी व नंदू नरोटे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.

error: Content is protected !!