– आठ तास चालली पोलिस – नक्षल चकमक
– मोठा नक्षल शस्त्रसाठा जप्त
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली – नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात पोलीस व नक्षलवादी यांच्यामध्ये चकमक उडाली असून या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. सदर नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी घटनास्थळावरील ताब्यात घेतले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, 25 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली – नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची विश्वासार्ह गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 2 पथके सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती.
सदर भागात सुरू असलेल्या प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज सकाळी सदर जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर परिसरात शोध घेतला असता एकूण 4 जहाल माओवाद्यांचे मृतदेह (1 पुरुष आणि 3 महिला) मिळून आले आहेत. याशिवाय घटनास्थळावरून 1 SLR रायफल, 2 INSAS रायफल व 1 303 रायफल जप्त करण्यात आले आहेत. सदर भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवादविरोधी अभियान सुरू आहे.







