– तीनजण जखमी ; रुग्णालयात उपचार सुरू
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी शहरातील भगतसिंग चौकातील हिरो कंपनीच्या दुचाकी शोरूमची इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला असून, तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. आकाश बुराडे (२५ वर्ष, रा. निलज, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर), तहसीन शेख (३० वर्ष, रा. वडसा, जि. गडचिरोली), अफसान शेख (३२ वर्ष, रा. वडसा, जि. गडचिरोली) अशी मृतक कामगारांची नावे आहेत. तर दीपक अशोक मेश्राम (२३ वर्ष, रा. आरमोरी, जि. गडचिरोली), विलास कवडू मने (५० वर्ष, रा. आरमोरी, जि. गडचिरोली), सौरभ रवींद्र चौधरी (२५ वर्ष, रा. मेंढकी, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) हे जखमी झाले आहेत.
आरमोरी येथील पंचायत समितीनजीकच्या भगतसिंह वॉर्डात एका जुन्या इमारतीत लालानी यांची हिरो मोटारसायकल कंपनीची शोरुम आहे. ही इमारत धोकादायक स्थितीत असतानाही तेथे शोरुम सुरू होती. आज तेथे कामगार वाहनांची दुरुस्ती करीत होते, तर काही नागरिक वाहनांचे सुटे भाग खरेदी वा नव्या वाहनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आले होते. संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास अचानक इमारतीचा मागचा भाग कोसळला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.
जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेले विलास मने हे तेथे मेकॅनिक होते. तिन्ही जखमींची हाडे तुटली असून, त्यांच्यावर आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.





