गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून युवक-युवतींसाठी मोफत MS-CIT प्रशिक्षण उद्घाटन समारंभ पार पडला ऑनलाईन

100

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा दुर्गम-अतिदुर्गम भागात वसलेला असून नक्षलग्रस्त जिल्हा म्हणुन ओळखल्या जातो. आज जगामध्ये संगणकाचे युग सुरू असून, माहिती तंत्रज्ञान हे खुप महत्वाचे झाले आहे. जिल्ह्रातील युवक-युवतींना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, तसेच सध्या शासनाद्वारे सरकारी नोकरी किंवा खाजगी कंपन्यामध्ये नोकरी मिळवायची असेल तर संगणकाचे ज्ञान असणे खुपच गरजेचे आहे. याच उद्देशाने आज दिनांक 06/06/2022 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन युवक-युवतींसाठी मोफत MS-CIT प्रशिक्षण उद्घाटन समारंभ ऑनलाईन पार पडले.
सदर MS-CIT प्रशिक्षण हे जिल्ह्रातील 200 युवक-युवतींना मोफत ऑनलाईन दिल्या जाणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ जिल्हातील युवक-युवतींना निश्चितच होणार असून भविष्यामध्ये त्यांच्या नोकरीकरीता तसेच खाजगी कंपनीमध्ये किंवा इतर अनेक संगणक कौशल्याचे काम करू ईच्छीना­या युवक-युवतींना याचा फायदा होईल, असे पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांनी MS-CIT प्रशिक्षणच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी सांगितले.
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 484, नर्सिंग असिस्टंट 1143, हॉस्पीटॅलीटी 296, ऑटोमोबाईल 254, इलेक्ट्रीशिअन 142, प्लंम्बींग 27, वेल्डींग 33, जनरल डयुटी असिस्टंट 38, फील्ड ऑफीसर 11 तसेच व्हीएलई 45 असे एकुण 2473 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआयआरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर 105 मत्स्यपालन 60 कुक्कुटपालन 444, बदक पालन 151, शेळीपालन 67, शिवणकला 105, मधुमक्षिका पालन 32, फोटोग्राफी 35, भाजीपाला लागवड 576, टु व्हिलर दुरुस्ती 34, फास्ट फुड 35, पापड लोणचे 30, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण 370, एमएससीआयटी 34 असे एकुण 2078 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यावेळी MS-CIT प्रशिक्षणच्या ऑनलाईन उद्घाटन समारंभात पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी, श्री. अनुज तारे हे उपस्थित होते.
MS-CIT प्रशिक्षणच्या ऑनलाईन उद्घाटन समारंभाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.