शिवसेनेच्यावतीने मार्कंडादेव येथे भाविकांसाठी भोजनदान

84
– पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून जिल्हा समन्वयक किरण पांडव यांचा उपक्रम
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिवसेनेच्यावतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी मार्कंंडादेव येथे 5 हजार यात्रेकरू व कर्मचार्‍यांसाठी भोजनदान कार्यक्रम आयोजित केला आहे.
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या गेलेल्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त आजूबाजूच्या राज्यासोबतच पूर्व विदर्भातील अनेक शिवभक्त दर्शनासाठी येतात. यावर्षी प्रशासनाने कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ 50 भाविकांना दररोज दर्शनाची परवानगी दिली असली तरी यात्रेच्या आदल्या दिवसापासूनच हजारो भाविक मार्कंडा येथे दाखल झाले होते. त्याचबरोबर येत्या सात दिवस मार्कंड्यात भाविकांची गर्दी वाढणार, हे निश्‍चित आहे. प्रशासनाने हॉटेल व दुकानांवर परिसरात बंदी घातली असल्यामुळे येणार्‍या भाविकांना व व्यवस्थेत असलेले कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी भोजनाची अडचण होऊ शकते. हे लक्षात घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने 5 हजार लोकांसाठी भोजनदान देण्याचा संकल्प निश्‍चित केला. त्यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी लागलीच तयारी करून भोजनदानाची उत्कृष्ट व्यवस्था करून येथे येणार्‍या भाविकांना निश्‍चितच दिलासा दिला आहे.