नमाद महाविद्यालयात मतदार जागृतीपर विद्यार्थी व्याख्यानमाला

241

– राज्यशास्त्र आणि सांस्कृतिक विभागाचा उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया (प्रतिनिधी) : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात मतदार जागृती सप्ताहानिमित्त पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग आणि सांस्कृतिक गतिविधी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मतदार जागृती’ या विषयावर आयोजित विद्यार्थी व्याख्यानमाला नुकतीच पार पडली.
गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षाताई पटेल, सचिव राजेंद्र जैन आणि संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात आभासी मंचावर आयोजित विद्यार्थी व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या. यावेळी सांस्कृतिक गतिविधी विभागाचे समन्वयक डॉ. अंबादास बाकरे, राज्यशास्त्र विभागाचे डॉ. एच. पी. पारधी, डॉ. किशोर वासनिक आणि डॉ. डॉ. शशिकांत चौरे उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी उद्याचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या मतदार जागृतीमुळे अनेक मतदारांंपर्यत पोहोचता येते. विद्यार्थ्यांमधील मतदार जागरूक झाला तर येणारा काळ लोकशाहीसाठी निश्चितच आशादायी असेल. हे जाणूनच मतदार या विषयावर विद्यार्थी व्याख्यानमाला आयोजित केल्याचे सांगितले.
बीजभाषण प्रा. घनशाम गेडेकर यांनी केले. प्रा. गेडेकर म्हणाले, प्रत्येकाला राजकीय भूमिका घ्यावीच लागेल. राजकीय भूमिका घेणे म्हणजे राजकीय पक्षाचे सदस्य होणे किंवा निवडणूक लढविणे नव्हे. तर राजकीय प्रक्रियेत लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी, जनतेच्या कल्याणासाठी भूमिका घेणे होय. नागरिकांच्या उदासीनतेमुळे राजकीय पक्षाची आणि लोकप्रतिनिधींची जनतेप्रतीची भूमिका गृहीत धरल्याची भावना होत आहे. ही लोकशाहीसाठी मारक आहे. सत्तेसाठी संघर्ष करणे, नवीन विचारांची निर्मिती करणे, चारित्र्य घडविणे, आंदोलन करणे आणि समाज सुधारणेसाठी प्रयत्न करणे ही राजकीय पक्षाची कामे होत. ही कामे राजकीय पक्षाकडून करवून घेण्यासाठी मतदारांची राजकीय भूमिका आवश्यक असल्याचे प्रा. गेडेकर यांनी सांगितले.
यावेळी मतदारांवर भ्रष्ट संसाधनांचा प्रभाव या विषयावर अमित गोपलानी, निवडणूक आणि मतदान व्यवहारात माध्यमांची भूमिका या विषयावर भाग्यश्री खोब्रागडे, जातीचा मतदानावर प्रभाव या विषयावर मनीष हनवते, मतदारांची उदासीनता या विषयावर अंजली धुर्वे व मतदारांची जागरूकता या विषयावर लक्ष्मी मुनेश्वर यांनी मत मांडले. विधार्थी व्याख्यानमालेचे प्रास्ताविक डॉ. एच पी पारधी यांनी केले. चाहत मेश्राम यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
विद्यार्थ्यानी मांडलेल्या विषयांचे अवलोकन डॉ. अंबादास बाकरे यांनी केले. तर डॉ. किशोर वासनिक व डॉ. शशिकांत चौरे यांनी विद्यार्थ्यांच्या व्याख्यानावर आपले मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन विश्वनाथ उईके तर आभार खुशबू तिवारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी सांस्कृतिक संघाचे विश्वनाथ उईके, खुशबू तिवारी, चाहत मेश्राम व संघाच्या विद्यार्थ्यांंनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला राज्यभरातील महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले.