पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करा : भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांची मागणी

93

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केली. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवण्याच्या षडयंत्राची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
किसनजी नागदेवे म्हणाले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी पंजाबमध्ये जे काही घडलं ते अत्यंत गंभीर होतं. या घटनेचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत आहे. या घटनेची राष्ट्रपतींनी गंभीर दखल घेतली पाहिजे. देशात वेगवेगळया पक्षांची, आघाड्यांची सरकारे आली होती. राज्यात आणि केंद्रात अनेकदा वेगवेगळया पक्षांची सरकारे देशाने पाहिली आहेत. मात्र पक्षीय द्वेषापोटी देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षा व्यवस्थेशी घातक खेळ आजवर कोणीच केला नव्हता. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची योजना केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणा परस्परांशी समन्वय ठेवून आखत असतात. पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेला राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेकडून सहकार्य मिळणे अपेक्षित असते. मात्र पंजाबातील घटनाक्रम पाहिला तर असे लक्षात येईल की, पंतप्रधानांच्या मार्गावर जाणीवपूर्वक आंदोलनाला परवानगी दिली गेली. आंदोलकांमुळे पद्धतशीरपणे रस्ता बंद होईल याची दक्षता घेतली गेली. जेथे हे घडलं तेथून पाकिस्तानची सीमा अतिशय जवळ आहे. पंतप्रधानांचा जीव जाणीवपूर्वक धोक्यात आणण्यासाठी केली गेलेली ही खेळी होती.
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुका ही देशाच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची गोष्ट असते. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. या घटनेसंदर्भात काँँग्रेस नेत्यांनी अतिशय निर्लज्ज प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान हा देशाचा असतो, कोण्या एका पक्षाचा नसतो. एवढी घटना घडूनही मुख्यमंत्री प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होत नाहीत, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. खालच्या पातळीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही किसनजी नागदेवे यांनी नमूद केले.