– गुरुदेव सेवा मंडळ शाखा अंतरगावच्या वतीने महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम
– श्री संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुण्यस्मरण महोत्सवाचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि आत्मविश्वासवृद्धी या त्रिसूत्रीचा उपयोग करून आपल्यासोबत कुटुंबाचा विकास साधावे.महिलांनी कसलाही भेदभाव न ठेवता स्वताला प्रगत करावे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची संधी दिली. सावित्रीबाई फुलेंचा व संतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी घेवुन स्त्रियांनी एकमेकांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिला आपली नेहमीची कामे करून स्वतःसाठी खास वेळ काडून सामाजिक भान जपत बचतगटाच्या माध्यमातून आज समोर आलेली आहे. आज आधुनिक युगात हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी एकजुट व्हावे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले.
श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा अंतरगाव यांच्या वतीने श्री संत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त तीन दिवसीय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह दरम्यान महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मेळाव्याच्या मुख्य मार्गदर्शक म्हणून नगराध्यक्ष बोलत होत्या.
सप्ताहदरम्यान भजन स्पर्धा, खंजिरी स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कांताबाई ठाकुर तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्या योगीताताई डबले, वैशालीताई शेरकी, कापसीच्या सरपंचा सुनीता काचीनवार, संगीता चौधरी, उषा भोयर, प्रतिभा बोबाटे, सुषमा ठाकरे, खुशबू उईके, नीता कंकडलवार, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर तसेच अनंतरगाव येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच छायाताई चकबंडलवार यांनी केले.