पदीनटोला गाव एकेविसाव्या शतकातही विकासापासून कोसोदूर

162

– गावात अद्यापही मुलभूत सुविधाच पोहचल्या नसतील तर याला विकास म्हणायचे का? : काँग्रेस डॉक्टर्स सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांचा सवाल

– डॉ. साळवे यांनी पदीनटोला गावाची व्यथा पत्रातून मांडली थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य मंत्र्यांकडे

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मानव प्राणी चंद्र, मंगळावर पोहचला असून सूर्यावरही मानवाच्या नजरा खिळल्या आहेत. मानवाची एकेविसाव्या शतकात वाटचाल सुरु आहे. असे असतानाही गडचिरोली-धानोरा या राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेले पदीनटोला हे गाव एकेेेविसाव्या शतकातही विकासापासून कोसोदूर आहे. शंभर वर्षांंचा इतिहास असलेल्या गावातील ग्रामस्थांचा अद्यापही मुलभूत सुविधांसाठी संघर्ष सुरुच आहे. गावात अद्यापही मुलभूत सुविधाच पोहचल्या नसतील तर याला विकास म्हणायचे का? असा सवाल काँग्रेस डॉक्टर्स सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांनी केला आहे. या गावाची व्यथा त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून मांडली आहे.
शंभर वर्षांंपूर्वी पदीनटोला या गावात पोरेटी कुटूंब वास्तव्याने आले. आजघडीला पोरेटी यांचे पाच कुटूंब आहे. सदर गावाचा चातगाव ग्रामपंचायतीअंतर्गत समावेश होतो. ग्रामपंचायतीच्या प्रमुख पदाधिका-यास आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांना घरकूल व अन्य योजनांचा लाभ मिळाला. परंतु पदीनटोला येथील नागरिकांपर्यंत अद्यापही शासकीय योजना पोहचल्या नाहीत. या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, आरोग्य, शिक्षणाच्या कोणत्याच सुविधा नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, रोजगाराचे कुठलेच साधन नाही. परिणामी अजूनही पोरेटी कुटूंबासह अन्य नागरीक आजही पशुधन सांभाळित जंगलावरच उपजीविका करीत आहेत.
शासनाच्या आदिवासी भागाकरिता विविध योजना राबविल्या जात असताना येथील ग्रामस्थांच्या विकासाकरिता एकही योजना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व शासनामार्फत पोहचलेल्या नाही. पदीनटोला हे गाव जंगलव्याप्त असल्याने ग्रामस्थांना हिंस्त्र प्राण्यांच्या दहशतीत वावरावे लागत आहे. अशावेळी विकासाच्या गप्पा मारणारे शासन पदीनटोला गावाच्या विकासाकडे लक्ष देणार काय असा, सवाल करीत डॉ. साळवे यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकासमंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पाठविलेल्या पत्रातून केला आहे. डॉ. साळवे यांनी या गावाच्या मांडलेल्या व्यथेतून महाविकास आघाडी शासनाला घरचा अहेर दिला आहे.
बॉक्स
जंगलात वसलेल्या पदीनटोला गावचे दुर्दैव

पदीनटोला या गावाला शंभर वर्षांंचा इतिहास आहे. घनदाट जंगलात वसलेल्या या गावात जेमतेम पाच घरे आहेत. मुलभूत सुविधांसाठी येथील ग्रामस्थांचा अजूनही संघर्ष सुरुच आहे. शासनाद्वारे अनेक कल्याणकारी योजना येथे पोहचलेल्याच नाहीत. अशास्थितीत विकासाच्या गप्पा करणारे, विकसीत म्हणणारे शासन पदीनटोला गावाच्या विकासाकडे लक्ष देणार काय? असा सवाल करीत पदीनटोला गावाचे दुर्दैव असेच कायम राहणार काय? असाही सवाल काँग्रेस डॉक्टर्स सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांनी पत्रकातून केला आहे.