जवाहर नवोदय विद्यालय घोटच्या जागेकरिता अखेर सव्वा २ कोटी रुपये मंजूर

96

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय घोट येथील जागेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून सुटलेला असून या विद्यालयाच्या जागा उपलब्धतेसाठी वनविभागाला द्यावयाचे २ कोटी 25 लक्ष ३८ हजार रुपये विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत मंजूर करण्यात आले असून निधी वितरणही करण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यालयाच्या मालकीच्या जागेवर बांधकामाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. त्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.
मागील अनेक दिवसांपासून जवाहर नवोदय विद्यालय घोट येथील जागा ही वनविभागाची असल्याने त्या जागेवर अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. जोपर्यंत सदर जागेसाठी लागणारा निधी वनविभागाला मिळणार नाही तोपर्यंत ही जागा विद्यालयाच्या मालकीची होणार नाही. यामुळे विद्यालयाच्या बांधकामाच्या व इतर समस्या देखील सुटणार नाहीत. ही बाब नवोदय विद्यालयाच्या स्थानिक प्रशासनाने गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या लक्षात आणून दिली. आमदार महोदयांनी तातडीने याबाबत तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री ना. स्मृतीजी इराणी व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन जागेबाबतचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यासाठी सातत्याने आवश्यक तो पत्र व्यवहार केला. जागेकरिता केंद्रीय सहायता योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी लावून धरली. विधानसभेच्या माध्यमातून तारांकित, लक्षवेधी व ईतर प्रश्नाच्या माध्यमातूनही विधिमंडळात राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले.
अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय सहायता योजने अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय घोट येथील जागेकरिता वनविभागाला द्यावयाचे 2 कोटी 25 लक्ष 38 हजार रुपये मंजूर करण्यात आले असून निधी वितरणही करण्यात आले आहे. त्यामुळे आता नवोदय विद्यालयाच्या बांधकामाचा प्रश्न मिटलेला असून लवकरच या ठिकाणी भव्य असे विद्यालय उभारले जाईल. निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी राज्य सरकारचे विशेष आभार मानले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे