चिचडोह बॅरेजच्या 38 दरवाज्यातून शुक्रवारी सोडणार पाणी

79

– गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी

– जिल्हा प्रशासनाचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजमधून 21 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता प्रकल्पाचे सर्व 38 दरवाजातून 190.23 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे या नदीकाठावर राहणाऱ्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

गोसीखुर्द धरणातून 40 घ. मी./सेकंद इतका विसर्ग सोडण्यात आला असल्याने 29 जून 2024 पर्यंत चिचडोह प्रकल्पाचा पाणीसाठा 179.800 मी. पर्यंत वाढेल. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी चिचडोह प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 कि.मी. अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस 4 किलोमिटर अंतरावर आहे. याची एकूण लांबी 691 मीटर असून त्यावर 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. चिचडोह बॅरेजमध्ये दिनांक 18 जून 2024 रोजी पाणी पातळी 178.90 मी. व पाणीसाठा 11.285 द.ल.घ.मी. इतका आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव, घारगाव, फराडा, वाघोली, चामोर्शी, हल्दीपुरानी, टेकडा, दोटकूली, कळमगाव, खंडाळा. एकोडी, अनखाेडा, इल्लूर, नविन लोंढोली, आष्टी, चपराळा, गणपूर व कढोली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील लोंढोली, उसेगाव, पार्डी, बेंबाळ, जिबगाव, पेठगाव, शिर्सी, साखरी, कोरंबी, बोरघाट, देवाळा (बु), चखठाणा, विठ्ठलवाडा, पिपरी व घाटकूळ या गावांना वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदीलगतचे सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे. तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना उचित सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे.