शेतकऱ्यांना ३१ जुलैपुर्वी पिक कर्जाचे वाटप करा

32

– शेतकरी कामगार पक्षाची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती दुर्गम असल्याने शेतकऱ्यांना पिक कर्जाकरिता मोठ्या अडचणी येत असल्याने शासनाच्या पिक कर्ज योजनेपासून हजारो शेतकरी वंचित राहतात. त्यामुळे कर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ करून ३१ जुलैपुर्वी शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कोणताही इच्छुक व पात्र शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि सर्व सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांनी काळजी घेण्याची गरज आहे. मागील अनुभव लक्षात घेता, जिल्ह्यातील अनेक बँका या शासनाने दिलेल्या लक्षांकाप्रमाणे पिक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप न करता वेगवेगळी कारणे देवून टाळाटाळ करतात. त्यामुळे रोवण्याचा हंगाम करण्यासाठी शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारावर उभे राहावे लागते.

सदरचा प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि बँकांनी पिककर्ज वेळेत आणि सुलभ प्रक्रीया राबवून तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच याबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधीत बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही भाई रामदास जराते यांनी केली आहे.