– भाजयुमोचा स्तुत्य उपक्रम ; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचा सहभाग, कामगारांच्या योगदानाचा गौरव
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या औचित्याने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा (भाजयुमो) गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला.
गडचिरोलीतील कर्तव्यदक्ष भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा…महाराष्ट्र माझा’ या गीताने सुरुवात करत गरजू कामगारांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यासोबतच वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण मिळावे यासाठी टी-शर्ट, टोपी व हँड ग्लोजचेही वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून आपल्या शुभहस्ते कामगारांना किटचे वाटप केले.
यावेळी मार्गदर्शन करताना मा. खा. डॉ. नेते यांनी कामगारांच्या कष्टमय जीवनाची जाणीव करून देत त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “मोठमोठे उद्योग, भव्य इमारती आणि विविध विकासकामे ही कामगारांच्या अथक श्रमांमुळेच साकार होतात. समाजाच्या प्रगतीत त्यांचा वाटा अत्यंत मोलाचा आहे,” असे ते म्हणाले. तसेच कामगारांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी शासन व समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष रजत वंजारी, शहराध्यक्ष साई सिल्लमवार, पत्रकार नरेंद्र माहेश्वरी, गायत्री सोमनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे गरजू कामगारांना दिलासा देण्याबरोबरच त्यांच्या कष्टांची कदर व्यक्त करण्यात आली. सामाजिक संवेदनशीलता जपत भाजयुमोने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.







