विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील चितरंजनपूर (येनापूर) येथे एका विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज, २७ नोव्हेंबरला दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली. मृतकांमध्ये रामेश्वर गंगाधर कुंभमवार (वय 41, रा. अनखोडा) व रियांशा धनराज वाढई (वय ८ वर्षे, रा. जामगिरी) यांचा समावेश असून रामेश्वर हा आपल्या दुचाकी क्र. एम. एच. ३४ ए डब्ल्यू. ५९२४ ने प्रकाश निलकंठ नागुलवार (वय ३२, रा. अनखोडा) यांच्यासोबत चामोर्शीकडे जात होते. अचानक समोरुन येणारे धनराज वाढई (रा. जामगिरी) हे दुचाकी क्र. एम. एच. ३३ डी. ९८७२ ने येनापूरकडे येत असताना दोन्ही विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार पाचही जण रोडवर खाली कोसळले. तेव्हा गडचिरोलीकडून येणाऱ्या एम. एच. ३४ बी. झेड २३७७ या ट्रकच्या मागच्या भागात रामेश्वर आल्याने ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरुन गेले असता ते जागीच गतप्राण झाले. तर रियांशा हिला जब्बर मार लागला व तिचाही जीव गेला. निलकंठ नागुलवार, धनराज वाढई व एक महिला गंभीर जखमी झाले. लागलीच स्थानिक लोकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र येनापूर येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक कुंदन गावडे हे आपल्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून रामेश्वरचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले व रियांशचा मृतदेह चामोर्शी येथे नेण्यात आला आहे. मृतक रामेश्वर गंगाधर कुंभमवार हे अहेरी येथील रुग्णालयातील १०८ या अॅम्ब्युलन्सचे चालक होते. त्यांना दोन मुली, पत्नी व असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. दोन दिवसांत दोघांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे अनखोडा गाव शोकसागरात बुडाला आहे. सदर अपघाताचा गुन्हा आष्टी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ट्रक व चालक यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात आष्टी पोलीस करीत आहेत.
सुरजागड प्रकल्प आणखी किती बळी घेणार : संतोष ताटीकोंडावार यांचा सवाल

गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या लोहखनिज प्रकल्पांमध्ये स्वतंत्र कॉरिडोर करण्यात यावे किंवा स्वतंत्र पाईपलाईन करून मालवाहतूक करण्यात यावे, अशी मागणी होत असताना सुद्धा ट्रकाद्वारे कच्च्या मालाची वाहतूक केली जात आहे. या ट्रकांच्या माध्यमातून रोज अपघात होत असून अपघाताचे सत्र सुरूच आहे. या अपघातामध्ये रोज एक – दोन मृत्यू पावल्याचे दिसून येत असून सुरजागड प्रकल्प आणखी किती लोकांचा बळी घेणार, असा सवाल जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी उपस्थित केला आहे. मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच प्रत्येकी कुटुंबातील एका व्यक्तीस सुरजागड किंवा कोनसरी येथे नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.






