– ३९ आश्रमशाळांचा सहभाग : भाडभिडी बिट ठरला उपविजेता
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचा समारोप येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी झाला. या क्रीडा स्पर्धेत कारवाफा बिट विजेता ठरला तर भाडभिडी बिटाने उपविजेतेपद प्राप्त केले. विजेता व उपविजेता संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, डॉ. प्रभु सादमवार, सुधाकर गौरकर, कार्यालयीन अधीक्षक वासुदेव उसेंडी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश गेडाम, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर, मुख्याध्यापक सुनील नन्नेवार, अजय आखाडे, एस. आर. मंडलवार, विजय देवतळे, माजी विभागीय क्रीडा समन्वयक प्रेमलाल कोरंडे, गणेश पराते आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना तसेच उत्कृष्ट वृत्तलेखन केल्याबद्दल प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १५ अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळेतील सुमारे अकराशे खेळाडूंनी सहभाग घेतला. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले आदी सांघिक तर लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळाचे आयोजन केले होते.
या संमेलनात कारवाफा बिट संघाने ३८९ गुण प्राप्त करून विजेतेपद पटकाविले. उपविजेता भाडभिडी बिट संघाला २४८ गुण मिळाले. विजेत्या कारवाफा बिटात कारवाफा, गडचिरोली, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही या शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा येथील अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे. उपविजेत्या भाडभिडी बिटात भाडभिडी, रेगडी, मार्कंडादेव या शासकीय तर गुंडापल्ली, अड्याळ, चामोर्शी, कन्हाळगाव येथील अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे.
स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडा कौशल्य प्रदर्शित झाले. अनेक अटीतटीच्या लढतीत आदिवासी खेळाडूंची क्रीडा नैपुण्यता दिसून आली. पारितोषिक वितरणानंतर मैदानावर खेळाडूंनी आनंद साजरा केला. यावेळी स्फूर्तीदायी गीतावर खेळाडू सोबत अधिकारी व कर्मचारीही थिरकले.
कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके यांनी केले. सांघिक खेळाच्या पारितोषिक वितरणाचे संचालन सुभाष लांडे व बळीराम जायभाये तर वैयक्तिक खेळाच्या पारितोषिक वितरणाचे संचालन प्रतिभा बनाईत यांनी केले. सतीश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण क्रीडा संमेलनाचे वृत्तलेखन प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे यांनी केले.
तीन दिवसीय क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही बिटातील क्रीडा निरीक्षक आशिष ढबाले, नागनाथ पवार, मोहन मारबते, जयप्रकाश गायकवाड, निलय गडे, पुरुषोत्तम बखर, रविकांत पिपरे, अशोक परतेकी, आनंद बहिरेवार, गुलाब डोंगरवार, संदीप राठोड, यशपाल पेंदाम, रामदास पिलारे, आशिष नंदनवार, संगीता मोडक, शारदा कोटांगले, विलास मडावी, डाकराम धोंगडे, क्रीडा मार्गदर्शक, शिक्षक, विविध समितीचे कर्मचारी, पंच व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.






