चामोर्शी – मूल रस्त्याची जिवघेणी दुर्दशा

23

– रस्त्याला पडले मोठमोठे भगदाड, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ सप्टेंबर : अत्यंत वर्दळीचा व महत्त्वपूर्ण असलेल्या चामोर्शी – मूल रस्त्याची जिवघेणी दुर्दशा झाली असून या रस्त्याला मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना ये- जा करतांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र प्रशासन व संबधित विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याकडे आतातरी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष्य देऊन या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी चामोर्शी नगर पंचायतीचे नगरसेवक आशीष पिपरे यांनी केली आहे.

चामोर्शी – मूल रस्त्याचे काही महिन्यांपूर्वीच नवीन काम झाले होते. मात्र अवघ्या काही दिवसातच अशी दुर्दशा होणे ही गंभीर बाब आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या रस्त्याने प्रवास करताना वाहनांचे सुद्धा मोठे नुकसान होत असते. त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था पाहून प्रचंड मनस्ताप नागरिकांना होत आहे. याबाबत गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांना भेटून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले तेव्हा खासदार महोदयांनी तत्काळ जिल्हाधिकारी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकाऱ्यांना तंबी देऊन तत्काळ खड्डे बुजविण्यात यावे, या मार्गाचे काम तत्काळ सुरू करावे व दोषी कंत्राटदारांवर व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.