आयुष्मान भव मोहिमेत सर्व नागरिकांना मिळणार आरोग्य सेवा : जिल्हाधिकारी संजय मिना

122

– जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक संपन्न

– 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविणार मोहीम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 5 सप्टेंबर : केंद्र शासनाची अत्यंत महत्वांकाक्षी  आयुष्मान भव मोहीम जिल्हयामध्ये 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत विविध आरोग्य योजनांचा समावेश जनसामान्यांसाठी करण्यात आलेला असून या कालावधीत सर्व नागरिकांना आरोग्य सेवा मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय मिना यांनी दिली. या संदर्भात जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, डॉ. बागराज धुर्वे तसेच जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुष्मान आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करुन आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात येणार आहे. आयुष्यमान भव मोहिमेची रुपरेषा, गावपातळीवर आयुष्मान सभेचे आयोजन, सदर उपक्रम गाव पातळीवर आरोग्य सेवा सुविधांची जनजागृती करण्याकरीता ग्रामपंचायत व VHSND यांच्यामार्फत राबविण्यात येतो. सदर मोहिमेचे मुळ उद्दिष्ट आयुष्मान कार्ड व आभाकार्डबाबत जनजागृती करणे, आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग इ. बाबत जनजागृती करणे, तसेच आरोग्य वर्धिनी केंद्र स्तरावर मिळणाऱ्या सुविधांचे मूल्यमापन करणे हा आहे.

या अंतर्गत आयुष्मानकार्ड व आभाकार्ड तयार करण्यात यावे, प्रधानमंत्री आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र
लाभार्थ्यांची यादी, लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी, या योजनेत संलग्न रुग्णालयांची यादी प्रसिध्द करण्यात यावी. तसेच
असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, आयुष्मानकार्ड व आभाकार्ड यांची जनजागृती व लाभार्थ्यांची अनुभवाची देवाण घेवाण करण्यात येणार आहे. आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवडयातील शनिवार किंवा रविवारी आयुष्मान मेळावा घेण्यात येणार आहे. सदर मेळाव्यादरम्यान आयुष्मानकार्ड व आभा कार्ड तयार करणे, सर्वसमावेशक आरोग्य सेवा, आयुष, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा, योगा व वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी तसेच टेलिकन्सलटेशन सेवा देण्यात येतील.

अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची (0-18 वयोगट) विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अंतर्गत मुलांना गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा पुरविणे, मुलांचे – 4 डी -1 (Defects at birth, Development Delays, Deficiencies and Diseases) करिता तपासणी, 32 सामान्य आजाराची वेळेवर तपासणी व उपचार. तसेच आवश्यकता असल्यास जिल्हा रुग्णालय स्तरावर शस्त्रकिया करण्याकरिता
संदर्भिय करण्यात येणार आहे. वरील उपक्रमासोबतच 1 ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान सर्व आरोग्य संस्थामध्ये सेवा पंधरवाडा राबविण्यात यावा. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व संस्थेमध्ये स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी. वरील सर्व उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजापणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आयुष्मान ग्राम सभा यांना प्रमाणित केल्यानंतर जिल्हास्तरावरुन प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी कळविले आहे.