आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मनापासून घडवा : उपायुक्त कुळमेथे

12

– कारवाफा आश्रमशाळेला दिली उपयुक्तांनी भेट

– भविष्यवेधीने केले विद्यार्थ्यांना बोलके

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २ सप्टेंबर : दुर्गम, अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे मोठे पवित्र कार्य आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील शिक्षकांच्या हातात आहे. हे करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करावे. मागील वर्षापासून सुरू झालेल्या भविष्यवेधी शिक्षणामुळे आश्रमशाळेतील न बोलणारे विद्यार्थी सुद्धा बोलके झाले आहेत. गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थी आता शिक्षकांसोबत मैत्रीपूर्ण वातावरणात शिकत आहेत ही बाब टिकवून ठेवा, असे प्रतिपादन आदिवासी विकास नागपूरचे उपायुक्त दशरथ कुळमेथे त्यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा येथे बुधवार, ३० ऑगस्ट रोजी भेटीदरम्यान शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उपायुक्त कुळमेथे पुढे म्हणाले, भविष्यवेधी शिक्षणामुळे मुले सहाध्यायी व स्वतःहून शिकण्यास प्रेरित झाले आहेत.जागतिक स्पर्धेमध्ये टिकेल व आव्हानांना सामोरे जाईल एवढी क्षमता त्याच्यात निर्माण करा. शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे काम करताना आश्रमशाळेमध्ये भेट देणाऱ्या पालकांसोबत सन्मानाने वागावे. पालकांना कृतीयुक्त उपक्रमाचा व्हिडिओ व आश्रमशाळेत सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण गोष्टी दाखविल्यास आश्रमशाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन चांगला होईल. त्यामुळे मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी आश्रम शाळेकडे आकर्षिला जाईल, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

भविष्यवेधी शिक्षणाची पाहणी व आढावा घेण्यासाठी प्रकल्पातील आश्रमशाळांना त्यांनी भेटी दिल्या. वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवादही साधला. त्यांच्यासोबत अपर आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपिक निलेश राठोड, कनिष्ठ लिपिक प्रशांत राऊत उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक विजय देवतळे, शिक्षक एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, सी. डी. नळे, सुधीर शेंडे, व्ही. व्ही. चव्हाण, वर्षा मस्के, चंदा कोरचा, व्ही. एम. नैताम, रविकांत पिपरे, व्ही. एम. बनगिनवार, झेड. एच. फाये, आय. एम. कुमरे, अधीक्षक जी. एस. सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, सुनिता दुर्कीवार व कर्मचारी उपस्थित होते.