नाट्यरूपाने गोष्टींच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन

18

कारवाफा आश्रमशाळेत कार्यक्रम : वाचनात गोडी निर्माण करण्याचा उद्देश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३१ ऑगस्ट : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी क्वेस्ट संस्था पालघर अंतर्गत पालवी गडचिरोली या चमुच्या वतीने नाट्यरूपात गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणातून लहान मुलांचे खूप मनोरंजन झाले.

क्वेस्ट संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील अंगणवाडीमध्ये प्रकल्पाचे काम सुरू आहे. या अंतर्गत गोष्टरंग उपक्रमाच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोष्टरंग उपक्रम चमूतील कलावंत हर्षा शर्मा, विकास कांबळे, योगेश्वर बेंद्रे यांनी उत्कृष्टपणे सादरीकरण केले. या कलावंतांच्या अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनीही छान प्रतिसाद दिला. नाट्यरूपाने गोष्टी सादर करून लहान मुलांमध्ये मनोरंजनासह वाचनात गोडी निर्माण करणे हा या उपक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आहे. वाढदिवसाचे चॉकलेट, गीत का कमाल या दोन गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक विजय देवतळे, उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, पद्मावती महेशगौरी, सी. डी. नळे, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, व्ही. व्ही. चव्हाण, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक व्ही. एम. नैताम, रविकांत पिपरे, व्ही. एम. बनगिनवार, झेड. एच. फाये, आय. एम. कुमरे, अधीक्षक जी. एस. सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, सुनिता दुर्कीवार, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.