वनहक्काच्या जमिनीवर प्लॉट करून विकणाऱ्या भूमाफिया व अधिकाऱ्यांवर कारवाई करा

40

– विधानसभेत महसूलमंत्र्यांकडे आमदार डॉ. देवरावजी होळी यांची मागणी

– संपूर्ण प्रकरणासह नोंदविलेल्या एफआयआरची पुन्हा चौकशी करण्याचे मंत्रीमहोदयांचे आमदारांना आश्वासन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३ ऑगस्ट : गडचिरोली शहरालगत असलेल्या मुरखळा (नवेगाव) येथील वनहक्काने मिळालेल्या ८ हेक्टर जमिनीची शासकीय यंत्रणेच्या अधिकार्‍यांना हाताशी अनधिकृतपणे खरेदी-विक्री करून त्या जागेवर प्लॉट काढून विक्री करणाऱ्या भूमाफियांवर व त्यांना सहकार्य करणाऱ्या वनविभाग, महसूल विभाग, टाऊन प्लॅनिंग व रजिस्ट्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विधानसभेत लक्षवेधीवरील चर्चेत सहभागी होऊन केली.

मुरखळा (नवेगाव) येथील १२ शेतकऱ्यांना वनहक्काच्या माध्यमातून सर्वे क्रमांक १०८ व १७९/२ मधील ८ हेक्टर जमीन देण्यात आली. त्या जमिनीवर भूमाफियांनी आपली नजर टाकून त्या १२ शेतकऱ्यांना भूलथापा देऊन विक्रीसाठी बाध्य केले. त्यासाठी त्यांनी आवश्यक असणाऱ्या शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला. वनविभाग, महसूल विभाग, रजिस्ट्री कार्यालय व टाऊन प्लॅनिंग या शासकीय यंत्रणांना हाताशी धरून त्यांच्याशी संगणमत करून नियमबाह्य पद्धतीने सर्व कागदपत्र तयार केले. त्यानंतर त्या वन जमिनीला सपाट करून अनधिकृतपणे प्लॉट पाडून त्या जागेची विक्री केली. या संदर्भामध्ये उपवनसंरक्षक कार्यालयाच्या मार्फतीने चौकशी करण्यात आली असून त्यामध्ये शासकीय यंत्रणेतील अधिकारी दोषी असल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे त्या सर्व प्रकरणाची व नोंदविण्यात आलेल्या एफ. आय. आर. ची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी यावेळी केली.

यावेळी महसूलमंत्री महोदयांनी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी उचललेल्या या संपूर्ण प्रकरणाची व त्यात नोंदविलेल्या एफ. आय. आर. ची पुन्हा सखोल चौकशी करू, असे आश्वासन विधानसभेत दिले.