– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी
– एमबीबीएस, बीएएमएस, नर्सिंग, आरोग्य सेवक, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांना शासनाने पुढील पदभरतीत प्राधान्य देण्याच्या मागणीकडे वेधले सभागृहाचे लक्ष
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ३ ऑगस्ट : कोविड-19 या महामारीच्या काळामध्ये शासनाने तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिल्यानंतर पूर्ण वेळ सेवेत राहून आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, ए. एन. एम., जी. एन. एम., आरोग्य सेवक, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी यांना पुढील पदभरतीमध्ये शासनाने प्रथम प्राधान्य देऊन सेवेची संधी द्यावी, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्नावरील चर्चेत सहभागी होऊन केली.
यावेळी ते म्हणाले की, एमबीबीएस, बीएएमएस या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच नर्सिंग, आरोग्य सेवक, तांत्रिक, अतांत्रिक कर्मचारी, तथा सेवा देणारे अन्य आरोग्य कर्मचारी असे अनेक कर्मचारी आहेत ज्यांनी त्या काळात सेवा देऊन देखील आता ते सेवेत नाहीत. त्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठे संकट कोसळलेले आहे. त्याचा विचार शासनाने करावा व पुढील काळात त्यांना संधी द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. होळी यांनी याप्रसंगी केली. यावेळी मंत्री महोदयांनी पुढील काळामध्ये अशा कर्मचाऱ्यांना संधी देण्यासाठी शासन नक्कीच पुढाकार घेईल, असे आश्वासन दिले.