महेश तिवारी यांची राज्य अधिस्वीकृती समितीवर निवड

62

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : न्यूज 18 लोकमतचे वरिष्ठ प्रतिनिधी महेश तिवारी यांची पत्रकारांसाठी असलेल्या राज्य सरकारच्या राज्य अधिस्वीकृती समितीवर सदस्यपदी राज्य सरकारने निवड केली आहे. महेश तिवारी हे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील रहिवासी असून दै. लोकसत्तामधून त्यांनी पत्रकारितेला 1994 मध्ये सुरुवात केली होती. तब्बल सहा वर्ष दै. लोकसत्तासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात पत्रकारिता केली आहे. 2000 पासून ईटीवी (etv Marathi) मराठीच्या हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी (Ramoji Film City) च्या मुख्यालयात कॉपी एडिटर पदावर त्यांची निवड झाली होती. दोन वर्ष हैदराबादमध्ये ईटीवीच्या मुख्यालयात रामोजी फिल्मसिटीत डेस्कवर काम केल्यानंतर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचे ईटीवीचे प्रतिनिधी म्हणून त्यांना पाठवण्यात आले. 2001 ते 2012 पर्यंत त्यांनी या दोन्ही जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून अनेक महत्त्वपूर्ण विषयांच्या बातम्या केलेल्या आहेत. एप्रिल 2013 पासून न्यूज 18 लोकमत (news 18 lokmat) या वाहिनीचे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्य सुरू केले. महाराष्ट्र टाइम्स (Maharashtra Times) या दैनिकासाठी नागपूर आवृत्ती सुरू झाल्यापासून गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत.

पञकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. पत्रकारांसाठी राज्य सरकारची सर्वोच्च अशी राज्य अधिस्वीकृती समिती आहे. या समितीच्या माध्यमातून पत्रकारांना अधिविकृती देण्यासह प्रसार माध्यमांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयाच्या संदर्भात राज्य सरकारसोबत ही समिती काम करते. या समितीमध्ये राज्यस्तरीय सदस्य म्हणून महेश तिवारी यांची राज्य सरकारने निवड केली आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम अशा सिरोंचा येथील रहिवासी असलेल्या महेश तिवारी यांची राज्य सरकारच्या या सर्वोच्च समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.