अहेरीत सुरू होणार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय ; 22 जुलैला उद्घाटन

100

– ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : गडचिरोली येथील जिल्हा सत्र न्यायालयात अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यातील पक्षकार व नागरिकांना ये-जा करणे खूप अडचणीचे होते. सोबतच भौगोलिक व क्षेत्रफळदृष्ट्या विचार करून या भागातील नागरिकांनी तसेच तालुका अधिवक्ता संघ अहेरी व सिरोंचा यांनी खूप वर्षाआधी अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व्हावे यासाठी मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे मागणी लावून धरली होती. तालुका अधिवक्ता संघ अहेरी व सिरोंचा तसेच या भागातील नागरिकांची तीव्र व एकमुखी मागणी लक्षात घेऊन अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू व्हावे यासाठी मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मागणी लावून धरले होते. अखेर ही मागणी मंजूर झाल्याने मंत्री आत्राम यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे शनिवार, 22 जुलै रोजी उद्घाटन होणार असून यासाठी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्यायमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी, अतुल चांदुरकर, संजय मेहरे आणि गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश ऊदय शुक्ल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रा. गवई यांनीसुद्धा अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू व्हावे यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन कसोशिने प्रयत्न केले होते. मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी स्वतः पुढाकार घेऊन अहेरी व सिरोंचा तालुका अधिवक्ता संघाला वेळोवेळी अधिवेशन काळात नागपुर तसेच मंत्रालय मुंबई येथे मदत करायचे. अहेरी अधिवक्ता संघाचे शिष्टमंडळ मुंबई येथे अनेकदा गेले असून त्यासाठी वेळोवेळी मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी मदतीसाठी पुढे सरसावले. अखेर अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू होत असल्याने नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त करून मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे आभार मानले आहेत.